राजापूर : रायपाटणच्या सरपंच सीमा गांगण यांचा कारभार अत्यंत चांगला असून, त्यांनी कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही व त्यामुळेच त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, गांगण यांच्याविरुद्द अविश्वास ठराव दाखल करताना संघटनेला कुठल्याही प्रकारची कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे रायपाटणच्या शाखाप्रमुख संदीप कोलते यांची हकालपट्टी केल्याची माहिती सेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी पत्रकारांना दिली. प्रभारी शाखाप्रमुख म्हणून अमोल शेटे यांची निवड केल्याचेही त्यांनी सांगितले.रायपाटणच्या सरपंच सीमा गांगण यांच्याविरुद्द सेनेच्याच आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. यापूर्वी राजापूर येथे पार पडलेल्या बैठकीत सरपंच गांगण यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, असे असतानाही तो आदेश न जुमानता या आठ सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला. हा पक्षाशी द्रोह असून, याप्रकरणी रायपाटणचे शाखाप्रमुख व आठ सदस्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे प्रकाश कुवळेकर यांनी सांगितले. शाखाप्रमुख संदीप कोलते यांची हकालपट्टी करून ओझर येथील अमोल शेटे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)शॉपीच्या विरोधामुळे अविश्वास : गांगणराजापूर : रायपाटण सरपंचपदी चांगले काम केले. मात्र, उपसरपंच राजेश नलावडे यांच्यासह अन्य तिघांच्या बिअरशॉपीला विरोध केला म्हणूनच आपल्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला, असा सणसणीत आरोप रायपाटणच्या सरपंच सीमा अशोक गांगण यांनी केला आहे.रायपाटणच्या सरपंच गांगण यांच्याविरोधात सेनेच्या आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला असून, या पार्श्वभूमीवर सरपंच सीमा गांगण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण सरपंच म्हणून चांगले काम केले. सर्व सदस्यांना सोबत घेऊनच काम केले. मात्र, आपल्याला सदस्यांकडून सहकार्य मिळाले नाही, असा आरोपही सरपंच गांगण यांनी केला आहे. आपण कुठल्याही प्रकारची मनमानी केलेली नाही. तरीही जाणूनबुजून आपल्यावर अविश्वास ठराव दाखल केल्याचा आरोप सरपंच गांगण यांनी केला आहे.शिवसेनेच्या बैठकीमध्ये आमदार राजन साळवी व तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्या उपस्थितीत आपल्याला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, असे असतानाही संघटनेचा आदेश धुडकावून लावत अविश्वास ठराव दाखल करणाऱ्यांची ही कृती संघटनेच्या निर्णयाविरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्याविरोधात अविश्वास दाखल करणाऱ्या सदस्यांनी नक्की कोणत्या कारणासाठी हा ठराव दाखल केला आहे, याचे उत्तर या सदस्यांना देता आलेले नाही. कारण त्यांची माझ्या विरोधातील कारणे ही तकलादू असल्याची टीका सरपंच गांगण यांनी केली. (प्रतिनिधी)
रायपाटण शाखाप्रमुखांची हकालपट्टी
By admin | Updated: July 19, 2016 00:24 IST