लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई -गोवा महामार्गावर असलेल्या वाशिष्ठी नदीवरील पुलासाठी व जोड रस्त्याच्या भरावासाठी नदीतीलच महसूलकडून कोणतीही परवानगी दिली नसल्याचे तहसीलदारांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या पत्रात स्पष्ट केल्याचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी सांगितले.
वाशिष्ठी नदीचे पात्र उत्खनन करून वाढविण्यात आले असून, त्यातील हजारो डंपर भराव नदीच्या बाजूंनी उत्खनन केले जात आहे. त्याची कोणतीही परवानगी तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. संबंधित ठेकेदार कंपनी खडी, वाळू, मकिंग यांचे हजारो डंपर माल निर्यात करीत आहे. त्याची रॉयल्टी भरली आहे का, असे विचारता परवानगीच नसल्याने रॉयल्टीचा प्रश्नच येत नसल्याचे पत्रात लिहिले आहे, तसेच हजारो टन नदीतून उत्खनन केले आहे. त्याची कोणतीही परवानगी तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही.
महापुरानंतर वाशिष्ठी पुलासाठी नदीतील उत्खनन होत असल्याचे दिसून येत होते; परंतु हे काम कार्यालयाच्या देखरेखीखाली झालेले नाही, अशीही माहिती अधिकाराला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. या उत्तराने शौकत मुकादम चक्रावले आहेत. एखादा ब्रास खडी, वाळू वाहतूक करताना महसूल अधिकारी तत्पर असतात, पण आता एवढे मोठे उत्खनन होत असताना कोणत्याही शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.