रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलातील बॅण्डमनच्या तीन जागांसाठी शुक्रवारी (३ सप्टेंबर) रोजी सकाळी १० ते ११.३० यावेळेत परीक्षा हाेणार आहे. रत्नागिरी शहरातील १७ केंद्रांवर परीक्षा होणार असून, या परीक्षा केंद्रावरील पाेलीस बंदाेबस्ताची उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी पाहणी केली.
पाेलीस दलातील बॅण्डमन पदासाठी ३ सप्टेंबर राेजी हाेणार आहे. या सर्व परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदाेबस्ताची उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी पाहणी केली. त्यांनी बंदाेबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना सूचना केल्या. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांची कसून तपासणी करावी, विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र तपासूनच साेडण्यात यावे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
परीक्षा केंद्रांवर उपविभागीय पोलीस अधिकारी ३, पोलीस निरीक्षक १४, सहाय्यक पोलीस निरीक्षक १३, पोलीस उपनिरीक्षक १८, पोलीस अमलदार १९८, व्हिडीओग्राफर ३३ व ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. तसेच ४ भरारी पथक तैनात राहणार आहेत.