गुहागर : असगोलीमधील वरचीवाडी प्राथमिक शाळा नं. २मध्ये २९ वर्षांपूर्वी गुहागर खालचा पाट येथील वसंत पावसकर या शिक्षकांनी शाळेमध्ये प्रत्यक्ष मूर्ती आणून सरस्वती पूजनाचा घातलेला पायंडा ग्रामस्थांनी आजही पुढे चालू ठेवला आहे. त्यानिमित्ताने समाजापुढे एक नवा संस्कृती आदर्श ठेवला आहे.येथील तलाठी पदावर कार्यरत असणारे गजानन धावडे यांनी सरस्वती मूर्ती पूजन परंपरेची माहिती देताना सांगितले की, २९ वर्षांपूर्वी शाळा नं. २मध्ये खालचा पाट येथील वसंत पावसकर या आदर्शवत शिक्षकाने सरस्वती केवळ पाटीवरच न काढता किंवा फोटो पूजन न करता शाळेमध्ये प्रत्यक्ष मूर्ती आणून पूजन सुरु केले. पुढे या शिक्षकाची बदली झाली. मात्र, हीच प्रथा पुढे गजानन धावडे व गणपत घाणेकर यांनी चालू ठेवली. सुरुवातीला दसऱ्याच्या आधी तीन दिवस आणून एकच मूर्ती तीन वर्षे पूजन केली जात होती. पुढे गावाचा सहभाग वाढला. देणग्या मिळू लागल्या. आर्थिक अडचण दूर झाल्याने आता दरवर्षी सात दिवस मूर्तीची प्रतिष्ठापना एकता वर्धक मंडळाच्या सभागृहामध्ये केली जाते.उत्सवाचे वाढते स्वरुप लक्षात घेऊन दसरा कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक तुकाराम घुमे, धोंडू घुमे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन धावडे, गणपत घाणेकर, संतोष घुमे, उमेश घुमे, नारायण घाणेकर, दिनेश घुमे आदी कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ अग्रेसर असतात. या उत्सवाला शारदा देवी उत्सव नाव देण्यात आले आहे. उत्सवादरम्यान भजन, जाकडी नृत्य, नमन, फॅन्सी ड्रेस व दांडिया आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यानंतर बक्षीस वितरण असे विविध कार्यक्रम होतात. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद, भजन व ढोल-ताशाच्या सुरात वाजतगाजत मूर्तीचे विसर्जन केले जाते. (प्रतिनिधी)
आजही जपलीय २९ वर्षांची प्रथा..!
By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST