लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भाऊ कितीही दूरवर असला तरी प्रत्येक बहीण आपल्या भावाला रक्षाबंधनाला राखी पाठवतेच. यावर्षी रविवारीच रक्षाबंधन आल्याने बहिणीने पाठविलेली राखी भावांपर्यंत वेळेत पाेहाेचणार की नाही, अशी शंका हाेती. पण सुटीचा वार असूनही पाेस्टमन काकांनी बहिणीने पाठविलेली राखी भावांपर्यंत पाेहाेचवून त्यांच्यातील हा प्रेमाचा धागा जाेडून ठेवला.
शिक्षणाला, नोकरीला व लग्नानंतर बहीण परजिल्ह्यांत, परराज्यांत किंवा परदेशात वास्तव्याला जाते. अतिवृष्टी, कोरोनाचे संकट यामुळे दळणवळणावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर लांब राहणाऱ्या अनेक बहिणींना रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी येणे जिकरीचे झाले आहे. अशावेळी सोशल मीडियावरून दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांसह राखी पाठविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण तरीही अनेकजण पाेस्टाने राखी पाठवितात. ही राखी भावापर्यंत पाेहाेचविण्याचे काम आजही पाेस्टमन काका करत आहेत.
यावर्षी रक्षाबंधन रविवारी म्हणजे सुटीच्याच दिवशी आला. रविवारी पाेस्ट कार्यालयाला सुटी असते; पण रक्षाबंधनाचे महत्त्व ओळखून आणि बहीण - भावाचे नाते जपण्यासाठी पाेस्टमनकाका सुटीच्या दिवशीही कार्यरत राहिले हाेते.
सुट्टी असूनही रविवारी अनेक ठिकाणी भावांना राखी नेऊन देण्याचे काम पाेस्टमन काकांनी केले. पाेस्टमन काकांच्या या सेवेमुळे अगदी रक्षाबंधनाच्या वेळेपर्यंत बहिणीच्या राखीची वाट पाहणाऱ्या भावांच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटले हाेते.