चिपळूण : शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आले. मात्र, अद्याप या मंडईचे गाळे बंद आहेत. या गाळ्यांबाबतचा प्रस्ताव नगररचनाकार व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दीड वर्षापूर्वीच पाठविण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला अद्याप ग्रीन सिग्नल न मिळाल्याने भाजी मंडई केव्हा सुरु होणार, असा सवाल जनतेतून केला जात आहे. शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने इमारत बांधण्यात आली आहे. ही जुनी इमारत पाडण्यासाठी सुरुवातीला व्यावसायिकांचा विरोध झाला. मात्र, पोलीस बंदोबस्तात ही इमारत तोडण्यात आली. या इमारतीमध्ये व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांना गेली ७ ते ८ वर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. तात्पुरत्या स्वरुपात काही भाजी विक्रेत्यांना मंडईच्या बाजूलाच व्यवसाय करण्यास नगर परिषद प्रशासनाने अनुमती दर्शवली आहे. मात्र, गाळे तयार झाले असून, त्यांचे मुल्यांकन न केल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.गेल्या दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष रिहाना बिजले, माजी आमदार रमेश कदम आदींच्या उपस्थितीत भाजी मंडईचे उद्घाटन झाले. येथील गाळ्यांबाबतचा प्रस्ताव नगररचनाकार रत्नागिरी व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे गेल्या दीड वर्षापूर्वीच पाठविण्यात आला आहे. मुल्यांकन झाल्यानंतरच हे गाळे भाड्याने दिले जाणार आहेत. मात्र, मंडईचे उद्घाटन होऊन गाळे बंद असल्याने याबाबत नगर परिषद प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणीही व्यवसायिकांतून केली जात आहे. (वार्ताहर)
भाजी मंडई गाळ्यांचे मूल्यांकन रखडले
By admin | Updated: August 18, 2014 21:36 IST