रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित केमिकल झोनला जिल्ह्यातील ४० पर्यावरण संस्थांनी एकत्रित विरोध दर्शवला आहे. कोकणवर लादलेला व कोकणवासीयांना विश्वासात न घेता घोषणा केलेला हा झोन म्हणजे जुलूमशाही आहे. त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होईल. शासनाच्या या जुलूमशाहीविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल. या झोनला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनाही पर्यावरण संस्थांच्या फेडरेशनद्वारे एकत्र आणले जाणार असल्याची घोषणा पर्यावरणविषयी संस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी फेडरेशनचे प्रतिनिधी युयुत्सू आर्ते, संजीव अणेराव व प्रशांत परांजपे उपस्थित होते. फेडरेशनतर्फे केमिकल झोनला विरोध असल्याचे निवेदन आज (गुरुवार) त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम या औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योगांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाल्याची उदाहरणे समोर असताना आता केंद्राच्या धोरणानुसार कोकणात २५ हजार हेक्टर्स क्षेत्रात ‘पेट्रोलियम, केमिकल, पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्र’ अर्थात केमिकल झोन उभारला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच नागपूरमधील कार्यक्रमात केली होती. त्याचे तीव्र पडसाद कोकणात उमटले आहेत. भाजपवगळता सर्वच पक्षांनी या झोनला तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चाही केली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात फेडरेशनने म्हटले आहे की, कोकणात उद्योग उभारण्यास आमचा विरोध नाही. परंतु केमिकल झोन माथी मारला जाऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे येथील फलोत्पादन, कृषी पर्यटन, मत्स्य व्यवसाय संपुष्टात येतील. येथे आय. टी. झोन, इंजिनिअरिंग क्षेत्र, प्रक्रिया उद्योग, वैद्यकीय उद्योग अशा प्रकारचे प्रदूषणविरहीत उद्योग, व्यवसाय उभारले जावेत. केमिकल झोन रद्द करावा. याबाबत आवश्यक तर कोकणवासीयांचे सार्वमत घ्यावे. कोकणातील सध्याच्या अतिप्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर बंदी आणावी, प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, प्रदूषित नद्या, खाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी तातडीचे उपाय करावेत. कोकणातील चारही जिल्हे पर्यटन हब म्हणून घोषित करावे. आय. टी. हब व पर्यटन हब म्हणून कोकणचे चारही जिल्हे घोषित करावेत, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)गेल्या महिनाभरापासून कोकणात केमिकल झोनचा विषय तापत चालला आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची घोषणा केली अन कोकणातील चारही जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्वप्रथम केमिकल झोनविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले. खासदार विनायक राऊत यांनी कोकणात हा झोन होऊ देणार नसल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कोकणात केमिकल झोनला कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट केले. कॉँग्रेस, मनसेनेही विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे केमिकल झोन चांगलाच तापला आहे.
केमिकल झोनविरोधात पर्यावरणवाद्यांचा एल्गार
By admin | Updated: September 24, 2015 23:56 IST