रत्नागिरी : शहरी बस वाहतुकीचे काही वाहक, चालक नागपूर येथे अधिवेशनासाठी गेल्याने आज अचानक काही शहरी फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर काही उशिराने सुटल्या. यामुळे शहरी बसस्थानकात परिक्षार्थी आणि नागरिकांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागले. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. त्यातच आज शनिवारचा आठवडा बाजार असल्याने शहराच्या आजूबाजूच्या भागातून आलेल्या नागरिकांचीही परत जाण्यासाठी सकाळपासूनच शहरी बसस्थानकावर गर्दी मोठ्या प्रमाणावर होत होती. शनिवारी बहुतांशी शाळाही लवकर सुटतात. दुपारी पेपर सुटल्यानंतर परिक्षार्थी विद्यार्थ्यांचीही एकच गर्दी या स्थानकावर होती. मात्र, बराच वेळ झाला तरी नेहमीच्या फेऱ्या सुटल्या नव्हत्या. याबाबत कुणाही प्रवाशाला कसलीही माहिती नव्हती. अखेर काही प्रवाशांनी शहर आगार व्यवस्थापकांकडे याबाबत चौकशी केली असता, त्याठिकाणी लावलेला सूचनेचा फलक दिसला. त्यावर काही अपरिहार्य कारणामुळे काही फेऱ्या रद्द होतील व काही फेऱ्या उशिरा सुटतील, असे लिहिलेले होते. त्याचे कारण काही प्रवाशांनी विचारले. मात्र, अधिकृतरित्या प्रवाशांना काहीही सांगण्यात आले नाही. मात्र, याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी रत्नागिरीतील काही चालक व वाहक गेल्याचे कळले. अधिवेशनाला काही चालक-वाहक गेल्याने उर्वरित चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण आल्याने आज शहरी वाहतूक प्रशासनाने काही फेऱ्या रद्द केल्या तर काही उशिरा सोडल्या. त्यामुळे शहर परिसरातील विविध भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना तीन ते चार तास रखडावे लागले. सुरूवातीला काही प्रवाशांनी चालक-वाहकांनी पुन्हा अचानक संप केला की काय, अशी शंका घेतली. मात्र, काही कालावधीनंतर चालक व वाहकांचे अधिवेशनाला जाण्याचे वृत्त कळले. साहजिकच ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांची गैरसोय करून कुठलीही पूर्वसूचना न देता अधिवेशनाला जाणाऱ्या चालक व वाहकांबद्दल प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. (प्रतिनिधी) पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक : एस. टी.चा दोन दगडांवर पाय पूर्वी रहाटाघर येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत होत्या. मात्र, त्या अडचणीच्या असल्याने प्रवासीवर्गाकडून मध्यवर्ती स्थानकातून त्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करून शनिवारपासून या सर्व गाड्या रहाटाघर येथून सोडण्यात येत असल्याचे स्थानकप्रमुखांकडून सांगण्यात आले. मात्र, कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या रहाटाघर येथूनच सुटणार आहेत.
कर्मचारी अधिवेशनात; विद्यार्थी स्थानकात
By admin | Updated: February 28, 2016 00:52 IST