रत्नागिरी : ज्या ॲण्टिजेन चाचणीमधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे, त्या चाचण्या जिल्ह्यात सरसकट करण्यापेक्षा खात्रीशीर असलेल्या आरटीपीसीआर चाचण्याच केल्या जाव्यात. सरसकट ॲण्टिजेन चाचण्यांमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून, सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरटीपीसीआरवर भर द्यावा, जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि जनतेतील भीती कमी होईल, अशी सूचना माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या ॲण्टिजेन चाचणीमधील असल्याचे दिसून आले आहे. मुळात कोरोनासाठी तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. एक आरटीपीसीआर, दुसरी ॲण्टिजेन आणि तिसरी ॲण्टिबॉडी टेस्ट. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नेही सुरुवातीपासून कोविडच्या चाचण्यांसंबंधी नियम बनवून दिलेत. आरटीपीसीआर टेस्ट ही कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही, हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते. आयसीएमआरने या चाचणीला टेस्टिंगचा गोल्ड स्टँडर्ड असे म्हटले आहे. शरीरात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला, तरी तो या चाचणीमार्फत कळू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात आरटीपीसीआरसाठीची करोडो रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा असताना ती यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरावी, असे नीलेश राणे यांनी सांगितले.
याउलट रॅपिड ॲण्टिजेन या चाचणीचे आहे. या चाचणीमधून फॉल्स निगेटिव्ह म्हणजे चुकीचा नकारात्मक रिझल्ट येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ॲण्टिजेनमध्ये निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणीसुद्धा करवून घ्यावी, असे खुद्द आयसीएमआरने सांगितले आहे. असे असताना रत्नागिरी जिल्ह्यात सरसकट ॲण्टिजेन चाचण्या होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१३ एवढी होती. त्यात ३४४ एवढे रुग्ण ॲण्टिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. याशिवाय, निगेटिव्ह रुग्णांची संख्या खूप आहे. या ॲण्टिजेन चाचणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून आरटीपीसीआर चाचण्या वाढवल्या पाहिजे. त्यामुळे ताण कमी होईल आणि लोकांमधील भीतीही कमी होईल, असे त्यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.