लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभ्ये : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील बंदी उठवण्यात आली असून, सोमवार, २० पासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकतेच दिले आहेत. प्रलंबित संस्थांची निवडणूक विविध टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये २७ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये विशेषत: क व ड वर्गातील संस्थांचा समावेश आहे.
सध्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा ताण उपनिबंधक कार्यालयावर अधिक आहे. कोरोनामुळे जवळपास दोन वर्षांपासून थांबलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुका अखेरीस सुरू झाल्याने काही दिवसांतच प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे अनेक वेळा पुढे ढकलल्या होत्या. काहीवेळा तीन महिन्यांची तर काहीवेळा त्यापेक्षा अधिक कालावधीची मुदतवाढ गेले दोन वर्षांमध्ये राज्य शासनाने दिली होती. अखेरीस कोरोनामुळे प्रलंबित राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. प्रलंबित संस्थांच्या निवडणुका विविध टप्प्यांमध्ये घेतल्या जाणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील एकूण २७ सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. यामध्ये क वर्गातील १२ व ड वर्गातील १५ संस्थांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या या २७ संस्थांसाठी ३१ ऑगस्ट २०२१ ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०१९ पूर्वी सभासद असणाऱ्या व निवडणुकीपर्यंत कार्यरत सभासदांना या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.
............................
आता मुदत संपणाऱ्यांचा नवा आदेश
जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत संचालक मंडळाची मुदत संपलेल्या संस्थांबाबत निवडणूक प्राधान्य, मनुष्यबळ व साधनसामग्री विचारात घेऊन निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीसाठी पात्र होणाऱ्या संस्थांबाबत लवकरच प्राधिकरणाच्यावतीने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.