गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड-बौद्धवाडी येथे गळफास घेऊन ६२ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. अशोक धोंडू पवार असे वृद्धाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
अशाेक पवार हे पत्नीसह राहत होते. त्यांना कुठले अपत्य नव्हते. मात्र, गेली अनेक वर्षे दोघेही एकमेकांशी अतिशय गुण्यागोविंदाने राहत असताना २ सप्टेंबर रोजी अशोक पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर त्यांचे बंधू प्रकाश धोंडू पवार यांनी गणपतीपुळे पोलिसांना दिली. गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर सरगर, सागर गिरी गोसावी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जाकादेवी येथील वैद्यकीय अधिकारी महेश मोरताडे व त्यांचे सहकारी अशोक सोनार यांनी शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार राहुल जाधव व त्यांचे सहकारी करीत आहेत