देवरुख : संगमेश्वर तालुक्याला कित्येक वर्षांपासून कायमस्वरुपी गटशिक्षणाधिकारी उपलब्ध न झाल्याने तालुक्याचा शिक्षण विभाग कित्येक वर्षे प्रभारींवरच अवलंबून आहे.संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पंचायत समितीच्या शिक्षण विभागामधील गटशिक्षणाधिकारी गेल्या तीन महिन्यांमध्ये तीनवेळा बदलले. तीनही वेळा किंबहुना त्या आधीचेही अधिकारी प्रभारीच होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून कायमस्वरुपी हक्काचा गटशिक्षणाधिकारी या विभागाला मिळू शकला नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात बदललेले गटशिक्षणाधिकारी हेदेखील प्रभारीच होते आणि हे पद विस्तार अधिकाऱ्यांना देऊन ‘प्रभारी’ नेमले जात होते.जिल्ह्याचा शिक्षण विभागाचा कारभार हाकणाऱ्या शिक्षण सभापती संगमेश्वर तालुक्यातील असल्याने त्यांच्याकडून तालुक्यातील जनतेच्या आशा उंचावल्या असून, आता तरी इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर कायमस्वरुपी गटशिक्षणाधिकारी मिळेल काय? अशी विचारणा अनेकांकडून होत आहे. दरम्यान के. जी. केसरकर यांच्याआधी अशोक मोहिरे यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज होता. मात्र, त्यांच्यानंतर आजपर्यंत या विभागाला कायमस्वरुपी गटशिक्षणाधिकारी लाभलेला नाही.मध्यंतरी प्रदीप पाटील यांच्याकडून सुनील पाटील यांच्याकडे तो पदभार देण्यात आला होता. मात्र, महिनाभराच्या आतच तो बदलून आता शैलजा खोत यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच या शिक्षण विभागामध्ये सध्या ३७ केंद्रप्रमुखांपैकी ४ पदे रिक्त असून, तालुक्यात पदवीधर शिक्षकांची ७५ पदे रिक्त दिसत आहेत. मात्र, पदवी झालेल्या शिक्षकांना तशी आॅर्डर मिळणे गरजेचे आहे. अशी आॅर्डर मिळाल्यास हा गुंता सुटण्यास मदत होणार आहे. मात्र हे आदेश देणार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण विभाग ‘प्रभारीं’वरच!
By admin | Updated: July 19, 2015 21:32 IST