चिपळूण : गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक तालुकास्तरावर मॉडेल स्कूल उभारण्यात येत आहे. हे मॉडेल स्कूल आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. शाळेसाठी आवश्यक त्या सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधा येथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. या मॉडेल स्कूलसाठी चिपळूण तालुक्यातून खेर्डी दातेवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची निवड झाली आहे. त्याचा आराखडाही निश्चित करण्यात आला आहे. या मॉडेल स्कूलसाठी सुमारे सव्वादोन कोटींचा खर्च केला जाणार आहे.
राज्य शासनाने पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी तालुका स्तरावर जिल्हा परिषद शाळा मॉडेल म्हणून विकसित केली जाणार आहे. तालुक्यातील खेर्डी दातेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतच हे मॉडेल स्कूल साकारले जाणार आहे. येथे पहिलीपासून सेमी इंग्रजीची सुविधा असेल. यावर्षी सेमी इंग्रजी माध्यमाची पहिलीपासून शाळा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये ज्या काही भौतिक सुविधा आहेत, त्या सर्व बाबी येथे अमलात आणल्या जाणार आहेत. यासाठी जुनी कौलारू इमारत पाडून तिथे तीन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. शेजारील दुमजली इमारतही तशीच राहणार आहे.
शिक्षकांच्या भेटीसाठी शाळेत येणाऱ्या पालकांसाठी खास स्वतंत्र दालन येथे असेल. विशेष करून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या आठवीपर्यंत असलेली शाळा दहावीपर्यंत वाढविण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दर्जेदार शिक्षकांची नेमणूक होणार आहे. त्याची आतापासूनच तयारी सुरु झाली आहे.
............................
आज जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती आपण पाहतच आहोत. या शाळांमधील विद्यार्थी संख्याही झपाट्याने घटत आहे. त्यामुळे शासनाला जिल्हा परिषद शाळांमध्ये बदल अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल उभारले जाणार आहेत. जे शिक्षक त्यागीवृत्तीने वेळ, काळ न पाहता शाळेसाठी योगदान देतील, त्यांनी येथे कामकाज करण्यासाठी अर्ज करावयाचे आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊनच शिक्षकांची नेमणूक होईल.
- दिशा दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्य, चिपळूण.
......................
अशा असतील सुविधा
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ॲक्टिव्हिटी रूम, संगणक लॅब, रासायनिक प्रयोगशाळा, इनडोअर स्टेडिअम, आऊटडोअर स्टेडियमही उभारले जाणार आहे. याचबरोबर डायनिंग हॉलची सुविधा आहे. मुलांसाठी, मुलींसाठी स्वतंत्र वॉशरूम, बाथरूम आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी चेंजिग रूम, संगीत खोली, कार्यानुभवकरिता स्वतंत्र खोलीची सुविधा असेल.
090721\img-20210709-wa0030.jpg
आंतरराष्ट्रीय दर्जाचे तालुका स्तरावर होणार मॉडेल स्कुल