सावंतवाडी : सावंतवाडीतून राज्य स्पर्धेसाठी एखादे तरी नाटक जाऊन या नाटकाने प्रथम क्रमांक मिळविण्याची कामगिरी करावी. परंतु संगीत नाटके थांबल्यामुळे ही शक्यता धूसर झाली होती. मात्र, क्षितीज इव्हेंटच्या माध्यमातून बंद पडलेल्या नाट्यचळवळीला पुन्हा उर्जितावस्था आणण्याचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिपादन ल. मो. बांदेकर यांनी केले. क्षितीज इव्हेंट आणि परमेश्वर प्रॉडक्शन यांच्यावतीने येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित केलेल्या संगीत ययाति आणि देवयानी नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सावंतवाडी शहरामध्ये नाट्यचळवळीला उर्जितावस्था आणण्यासाठी १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान कै. दिनकर धारणकर स्मृतिप्रित्यर्थ तीन दिवसांच्या नाट्यमहोत्सवाची घोषणा यावेळी करण्यात आली. संगीत देवयानी नाटकाचा शुभारंभ ल. मो. बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आबा नेवगी, अॅड. श्याम सावंत, रवी रेगे, जया गोरे, डॉ. श्रीपाद कशाळीकर तसेच क्षितीज इव्हेंटचे पदाधिकारी आशुतोेष चिटणीस, गोविंद पळसाशी, नितीन कारेकर, संदीप धुरी, हरिश्चंद्र पवार, दिव्या शेवडे, अपूर्वा चिपळूणकर, प्रा. सिध्देश नेरूरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात गोविंद पळसाशी यांनी, निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेने अनेक संगीतमय, दर्जेदार व नाविन्यपूर्ण नाटकांंची निर्मिती केली आहे. नवकलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा व कला वृध्दिंगत करण्याचा उद्देश समोर ठेवून संस्था वाटचाल करीत आहे. संगीत नाट्यक्षेत्रात इच्छुक कलाकारांनी आमच्यासोबत येऊन सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करावी व सावंतवाडीसह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पळसाशी यांनी केले.श्री परमेश्वर प्रॉडक्शनचे अध्यक्ष बाळ पुराणिक यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आशुतोष चिटणीस, आभार हरिश्चंद्र पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)सावंतवाडी येथील नाटकाचा शुभारंभ ल. मो. बांदेकर यांच्याहस्ते झाला. यावेळी आबा नेवगी, अॅड. श्याम सावंत, रवी रेगे, जया गोरे आदी उपस्थित होते.
‘क्षितीज’मुळे नाट्यचळवळीला उर्जितावस्था
By admin | Updated: November 11, 2014 23:18 IST