मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली असून, कळपाने रस्त्याच्यामध्ये ठाण मांडून बसलेली असतात. मात्र, नगर परिषदेकडून मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई सुरू असून गेल्या महिनाभरात ८६ जनावरे पकडण्यात आली असून गो-शाळेकडे पाठविण्यात आली आहेत. नगर परिषदेने ‘गो -शाळे’साठी जागेची मागणी करण्यात आली आहे.
शहरात साळवी स्टाॅप, शिवाजीनगर, मारुती मंदिर, गोडबोले स्टाॅप, आठवडा बाजार, टिळकआळी, लक्ष्मी चाैक, परटवणे परिसरात मोकाट जनावरे हिंडत असतात. कळपाने जनावरे शहराच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यावर ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा तर प्राप्त होतो. शिवाय अंधारात जनावरे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढल्याने नगर परिषदेकडून जनावरे पकडण्याची कारवाई सुरू आहे. दोन वेळा जनावरे पकडून देवरूख येथील ‘गो-शाळेत’ पाठविण्यात आली आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगर परिषदेकडून कारवाई सुरू आहे.
वाहनचालक व पादचाऱ्यांना मोकाट जनावरांचा होणारा त्रास टाळण्यासाठी नगर परिषदेकडून कारवाई करण्यात येत आहे. मोकाट जनावरे ताब्यात घेण्याची कारवाई गेल्या महिनाभरात दोन वेळा करण्यात आली. जनावरे पकडल्यानंतर त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या देवरूख येथील गो-शाळेत पाठविण्यात आले आहे. निव्वळ जनावरे पकडण्याऐवजी त्यांची सुरक्षितताही महतत्त्वाची आहे. त्यामुळे ‘गो-शाळा’ असणे महत्त्वाची असून त्यासाठी जागेची आवश्यकता आहे.
-निमेश नायर, आरोग्य सभापती, रत्नागिरी नगर परिषद.
जनावरे पकडून गो-शाळेकडे रवाना
मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई नगर परिषदेकडून केली जात असतानाच जनावरांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात येत आहे. देवरूख येथील विश्व हिंदू परिषदेच्या गो-शाळेत पाठविण्यात आली आहेत. नगर परिषदेकडून सुरुवातीला ४६ व त्यानंतर ४० मिळून एकूण ८६ जनावरे ताब्यात घेत गो-शाळेकडे रवाना करण्यात आली आहेत. विश्व हिंदू परिषदेचेही सहकार्य नगर परिषदेला प्राप्त झाले आहे.
‘गो-शाळे’साठी जागेची मागणी
मोकाट जनावरे पकडल्यानंतर ‘गो-शाळेत’ सुरक्षित ठेवण्यासाठी नगर परिषदेने जागेची मागणी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदन सादर करून जागेची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून भविष्यात पकडलेली मोकाट जनावरे ‘गो-शाळेत’ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
या मार्गावर
वाहने जपून चालवा
साळवी स्टाॅप ते चर्मालय
शिवाजीनगर ते मारुती मंदिर
गोडबोले स्टाॅप ते चर्मालय
मांडवी नाका ते पेठकिल्ला
आठवडा बाजार ते टिळक आळी
गोखले नाका ते लक्ष्मी चाैक
परटवणे ते बाणखिंड
उद्यमनगर ते मिरकरवाडा महामार्ग