देवरुख : देवरुख भूमिअभिलेख कार्यालयाचे मुख्य सहायक शशिकांत महादेव यादव (वय ५६) यांना कार्यालयातील अॅण्टी चेंबरमध्ये पाच हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता करण्यात आली. जमिनीची मोजणी तारीख लवकर मिळण्यासाठी पाच हजाराची मागणी करण्यात आली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीने केलेली ही गेल्या वर्षभरातील तिसरी कारवाई आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवरुख उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयामधील मुख्य सहायक शशिकांत यादव याने जमीन मोजणीची तारीख लवकर मिळवून देतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी ८ डिसेंबर २०१५ रोजी जमीन मोजणीसाठी शुल्क म्हणून बँकेत चलन भरले होते. त्यानंतर मोजणीची तारीख लवकर देतो, आमचे काहीतरी बघावे लागेल म्हणून यादव यांनी ५ हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती.यादव यांच्याकडून झालेली मागणीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीकडे होताच या विभागाने सापळा रचला. सांगवे, ता. संगमेश्वर गावातील गट नं. ३४६ ही जमीन लवकर म्हणजे १५-१६ जानेवारीला मोजून देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने तक्रारदार यांनी शशिकांत यादव यांना ५ हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी भूमि अभिलेख कार्यालय गाठले. ते पैसे देण्यासाठी आले असल्याची खात्री होताच शशिकांत यादव यांनी भूमिअभिलेख उपअधीक्षकांच्या अॅण्टी चेंबरमध्ये पैसे घेण्यासाठी गेले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागने यादव यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक सतीश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बर्गे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू जाधव, नाना शिवगण, पोलीस हवालदार दिनेश हरचकर, संतोष कोळेकर, गौतम कदम, पोलीस नाईक नंदकिशोर भागवत, प्रवीण वीर, महिला पोलीस नाईक गायत्री विजापूरकर, जयंती सावंत आदींच्या टीमने कारवाई केली. (प्रतिनिधी)सेवानिवृत्तीला सहाच महिने होते...मुख्यालय सहायक शशिकांत यादव यांचे केवळ सहा महिने सेवानिवृत्तीकरिता शिल्लक होते. दरम्यान, भूमिअभिलेख कार्यालयाविषयी यापूर्वी तालुक्यातील जनतेच्या अनेक तक्रारी होत होत्या. त्या आमसभेमध्येही अनेकांनी व्यक्त केल्या होत्या. काहींनी तक्रार अर्ज दिले होते. या कार्यालयाच्या कारभाराबाबत अनेकजण कंटाळले होते. त्यातच या कारवाईमुळे लाचखोरांना अशाच प्रकारे अडकवायला हवे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
देवरूखातील अधिकारी जाळ्यात
By admin | Updated: December 11, 2015 23:47 IST