गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांना जीवदान देणाऱ्या जीवरक्षकांचा रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती हा सत्कार करण्यात आला.
यावेळी जयश्री देसाई म्हणाल्या की, गणपतीपुळे येथील जीव रक्षकांचे काम काैतुकास्पद आहे. आपला जीव धोक्यात घालून अनेक पर्यटकांचे जीव रक्षकांनी प्राण वाचविले आहेत. आपला जीव धाेक्यात घालून इतरांचा जीव वाचविणाऱ्या जीव रक्षकांचा विमा उतरवणे गरजेचे आहे. यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गणपतीपुळे समुद्रात सांगली येथील प्रणेश मुकुंद वसगडेकर (वय २३) तसेच पृथ्वीराज पाटील (२५) हे समुद्राच्या पाण्यात बुडत असताना येथील जीव रक्षकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रणेश याचा मृत्यू झाला, तर पृथ्वीराज याला वाचविण्यात यश आले. त्याला वाचविणाऱ्या जीव रक्षकांचा जयगड पोलीस स्थानकातर्फे पोलीस निरीक्षक जयदीप कलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्त निवास येथे सत्कार करण्यात आला. रोहित चव्हाण, अनिकेत चव्हाण, विशाल निंबरे, विक्रम राजवाडकर, मयूरेश देवरुखकर, उमेश म्हादे, अनिकेत राजवाडकर, आशिष माने, अक्षय माने, ओंकार गावणकर, पोलीस मित्र विश्वास सांबरे या जीव रक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी जयगड पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कलेकर, गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार, पर्यटक निवासचे व्यवस्थापक वैभव पाटील, श्रीदेव गणपतीपुळे संस्थानचे विश्वस्त डॉ. श्रीराम केळकर, डॉ. अमित मेहेंदळे, गणपतीपुळे पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल राहुल जाधव, पोलीस शिपाई प्रशांत लोहकर, पोलीस शिपाई मधुकर सलगर, पोलीस शिपाई सागर गिरीगोसावी, पोलीस पाटील विश्वनाथ पाटील उपस्थित होते.