असगोली : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था व खेड तालुका पॅरा अॅटलॅटिक अलायन्स यांच्यातर्फे रविवार ८ रोजी सकाळी १० वाजता गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे कार्यालय वरवेली (चिरेखाण फाटा) ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय अस्थिव्यंग अपंग खेळाडूंच्या मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या मैदानी क्रीडा स्पर्धेत गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे इतर क्रीडा प्रकार ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येक खेळाडूला कोणत्याही दोन क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. या क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूंसाठी पुढील कागदपत्रे स्पर्धेला येताना सोबत घेऊन यायची आहेत. सिव्हील सर्जन, रत्नागिरी यांच्याकडील ४० टक्के व त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले प्रमाणपत्र, रेशनकार्ड झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, दोन पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे.या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या खेळाडूंना जिल्ह्यामार्फत दि. २१ व २२ रोजी नागपूर क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अपंग खेळाडूंच्या मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे. या प्रमाणपत्रांचा प्रत्येक खेळाडूला त्याच्या नोकरीच्या कामी व इतर कामीही चांगला फायदा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व अस्थिव्यंग अपंग खेळाडूंनी (शाळा, कॉलेज व अपंगासाठी कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांमधील अपंग खेळाडूंनी) लाभ घेऊन, स्पर्धेच्या दिवशी सर्व कागदपत्रांसह व स्वखर्चाने आपापल्या जबाबदारीवर उपस्थित रहावे, असे संस्थेमार्फ त अध्यक्ष संतोष पालकर, सरचिटणीस उदय रावणंग यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी उदय रावणंग (गुहागर), डॉ. बाळासाहेब ढेरे (पालशेत), सुनील पाडावे (गुहागर), विजय कदम (आरवली), अनंत पारधी (दाभोळ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था व खेड तालुका पॅरा अॅटलॅटिक अलायन्स यांच्यातर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)
गुहागरमध्ये जिल्हास्तरीय अस्थिव्यंग अपंग खेळाडूंच्या मैदानी क्रीडा स्पर्धा
By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST