रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात सुरू असलेल्या नो पार्किंगविरोधातील धडक मोहिमेला लोकप्रतिनिधीनीच खो घालण्यास सुरुवात केली आहे. नो पार्किंगमधील वाहने टोर्इंग व्हॅनमधून नेत असताना ती पुन्हा उतरवण्यास स्थानिक आमदारांनी पोलिसांना भाग पाडल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच आमदारांकडून खो दिला जात असल्याचे दिसत आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी १0 वाजता मारूती मंदिर परिसरात घडली. वर्दीतील पोलिसांनाच अशा पद्धतीने वागणूक दिल्याने पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने मास्टर प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार शहरातील वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी शहरात नो पार्किंगविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. रहदारीच्या ठिकाणी वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. नो पार्किंग झोनमध्ये पोलिसांकडून मोठे साईन बोर्डही लावण्यात आले आहेत. नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केल्यास ती टोर्इंग व्हॅनद्वारे उचलून नेण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. दिवाळीपूर्वीच ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेद्वारे वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे. बेशिस्तपणे वाहने रस्त्यावर कोठेही उभी करून रहदारीला अडथळा करण्यात येत होता. अचानक ही मोहीम सुरू झाल्यामुळे नाराजीचा सूर होता. मात्र, वाहनचालकांच्या हे अंगवळणी पडल्यानंतर मोहिमेचे स्वागत करण्यात आले.शहरातील बसस्थानक, मारूती मंदिर अशा रहदारीच्या ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आली आहे. मारूती मंदिर येथील हॉटेल गोपाळजवळ नो पार्किंगचा बोर्ड लावण्यात आला आहे. हा बोर्ड असूनही त्याठिकाणी रविवारी वाहने पार्क करून ठेवली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी टोर्इंग व्हॅनद्वारे ही वाहने उचलली. ही सर्व वाहने घेऊन जात असतानाच कोणीतरी स्थानिक आमदारांना माहिती दिली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळ गाठले. तेथे आल्यानंतर त्यांनी पोलिसांनाच पार्किंगचे धडे दिले. तसेच ही सर्व वाहने पुन्हा खाली उतरवण्यास भाग पाडले. मोहिमेत खुद्द आमदारांनीच हस्तक्षेप केल्याने पोलिसांनी सर्व वाहने तेथे उतरवून ते निघून गेले. मात्र, या प्रकारामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. (प्रतिनिधी)मंगला हॉटेल ते जैन मंदिर, स्वस्तिक हॉस्पिटल ते कौस्तुभ जनरल स्टोअर्स, अशोक हॉटेल ते दिलखूश गादी कारखाना, कलेक्टर कंपाऊंड, कामगार न्यायालय व गोगटे - जोगळेकर महाविद्यालय यांनी स्वत:ची पार्किं ग व्यवस्था करावी. मारूती मंदिर चौक (आंब्याखाली व शिवाजी स्टेडियमसमोर) शांती सुपर मार्केट ते मारुती आळी पुलावर व्यापाऱ्यांच्या दुचाकींसाठी मंगला हॉटेल ते जैन मंदिर, हेड पोस्ट आॅफीस या ठिकाणी दुचाकी पार्किं गची व्यवस्था करण्यात आली आहे.रविवार असूनही वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांविरोधात कारवाई सुरू ठेवली होती. ‘आॅन ड्युटी’ असूनही लोकप्रतिनिधींनी थेट त्यांनाच धारेवर धरल्याने पोलिसांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधीच अशी भूमिका घेत असतील तर कर्मचाऱ्यांनी काम कसे करायचे, असा सवालही या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.आमदारांनी पोलिसांना हटकल्यानंतर त्यांनी टोर्इंग व्हॅनमधील सर्व गाड्या तेथेच उतरवून व्हॅन कंट्रोल रूमला नेऊन उभी केली. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत योग्य तो तोडगा काढावा, तरच कारवाईचे सत्र सुरू ठेवले जाईल, अशी भूमिका वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आमदारांचा खो
By admin | Updated: November 15, 2015 23:53 IST