टेंभ्ये : सध्या जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहेत तसेच कोरोनाचा प्रसारही आटोक्यात आला आहे. त्यामुळे आतातरी शिक्षकांना कोरोना ड्युटीतून कार्यमुक्त करा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्य शासनातर्फे कोरोना प्रसार नियंत्रित करण्यासाठी विविध निर्बंध जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मार्च २०२०पासून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड १९ अंतर्गत कामकाज करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. जवळपास गेली दीड वर्ष सातत्याने शिक्षक कोविड संदर्भातील वेगवेगळे कामकाज करत आहेत.
गेली दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारची सुट्टी न घेता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्वप्रकारची कामे करत आहेत. सध्या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने आपली जबाबदारी सांभाळून शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षकांनी केली आहे. शिक्षकांना ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापनावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही शाळेत जाऊन त्यांचे काम पूर्ण क्षमतेने करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांना कोरोना ड्युटीतून कार्यमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.