लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : गुहागर तालुक्यातील अनेक नागरिकांकडे शिधापत्रिका असूनही व त्यांचे वार्षिक उत्पन्न अत्यंत अल्प असतानाही रास्त दराचे धान्य मिळत नाही. गोरगरीब कुटुंबांना रास्त दरात मिळणारे धान्य मिळावे, अशा मागणीचे निवेदन गुहागर तालुका मनसेतर्फे विनाेद जानवलकर यांनी गुहागर तहसीलदार यांच्याकडे दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील नागरिकांजवळ शिधापत्रिका असूनही व वार्षिक उत्पन्न अत्यंत अल्प असतानाही त्यांना स्वस्त दराचे धान्य मिळत नाही.
यामध्ये काही नागरिक निराधार आहेत तर काहींच्या घरी कुणीही कमवतं नाही. ते रेशनवरील स्वस्त धान्यापासून पूर्णतः वंचित राहिले आहेत. या निराधार नागरिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.
सुमारे ५ वर्षांपूर्वी प्राधान्य लाभार्थी योजनेतून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु, अद्यापही कार्यवाही झाली नाही. या निवेदनासोबत काही कुटुंबांची शिधापत्रिकांची नकल प्रत जोडण्यात आली आहे. या कुटुंबांना रास्त दरात धान्य मिळणाऱ्या योजनेपासून पूर्णतः वंचितच राहावे लागत आहे. या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी शेवटी केली आहे.