सावर्डे : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात पंचायत समिती चिपळूणचे उपसभापती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. काेयना प्रकल्पग्रस्तांसंदर्भात येत्या आठवड्यात ठोस निर्णय घेण्यासाठी पवार यांच्याकडून बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते.
व्यापारी अडचणीत
चिपळूण : कोरोना आणि महापुरामुळे स्थानिक व्यापारी आधीच अडचणीत आहेत. त्यातच, कोरोना काळापासून ऑनलाइन खरेदी वाढली असून, सध्या चिपळूणात ऑनलाइनचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
हातगाड्यांचे वितरण
शिरगाव : चिपळूण येथील बांधकाम व्यावसायिक यासिन दळवी यांच्या सामाजिक संस्थेतर्फे शहरातील गरजू हातगाडीधारकांना हातगाडीचे वाटप करण्यात येणार आहे. २३ रोजी मिलत नगर गोवळकोट येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हा वितरण कार्यक्रम होणार आहे.
निवडणुकीसाठी अर्ज
रत्नागिरी : गृहनिर्माण संस्थांच्या ई-वर्गातील संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ४ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
खांबल यांची निवड
राजापूर : शहरानजिकच्या धोपेश्वर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायतीचे सदस्य व मनसेचे नेते पुरुषोत्तम खांबल यांची निवड करण्यात आली आहे. खांबल यांनी महामार्गाच्या दुरवस्थेसह अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून, तालुक्याला न्याय मिळवून दिला आहे.