आबलोली : ग्रामपंचायत पथदीपांचे वीज बिल हे १५ व्या वित्त आयोगातून कपात न करता शासनाने त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.
ग्रामविकास विभागाने दिनांक २३ जून २०२१ रोजी शासनाने १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून पथदीपांचे वीज बिल भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध होत आहे. महाराष्ट्रातील अनेक छोट्या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा फार कमी मिळतो. त्यामधूनच संगणक परिचालकाचे मानधन द्यावे लागते. त्यामधूनच जर पथदीपांचे वीज बिल भरले तर गावाचा विकास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या पथदीपांचे वीज बिल १५ व्या वित्त आयोगातून देण्याचा जो शासन निर्णय घेण्यात आला आहे. तो त्वरित मागे घेण्यात यावा आणि राज्य सरकारने वीज बिल भरण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी मागणी प्रमेय आर्यमाने यांनी केली आहे.