रमेश कदम : नगराध्यक्षांना नाहक बदनामीचा घाटचिपळूण : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामापोटी ठेकेदाराला धनादेश द्यावा. यासाठी पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा मोर्चा आणण्यात आला. नगराध्यक्षांना कोणत्याही धनादेशावर सही करण्याचा अधिकार नाही, असे असताना नगराध्यक्षांचे नाव नाहक बदनाम करण्याचा घाट काहींनी घातला. आता ठेकेदाराला देयकाचा धनादेश देऊन झाला आहे. तरीही सांस्कृतिक केंद्राचे काम का सुरू झाले नाही, याचे उत्तर ठेकेदारासाठी मोर्चा काढणाऱ्यांनी द्यावे, असे माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, असे आम्हालाही वाटते. सन २००५पासून सांस्कृतिक केंद्र बंद आहे. त्यावेळी सत्ताधारी वेगळे होते. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही सांस्कृतिक केंद्राबाबत पाठपुरावा सुरु केला. माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी दीड कोटी रुपये आम्हाला दिले आणि या कामाला गती आली. परंतु, निकषानुसार त्याचा खर्च केला जात आहे. त्याचे राजकारण केले जात आहे. काही लोकांनी भंगार विकले, त्याचे मूल्यांकन केले नाही आणि बोंबाबोंब सुरु केली आहे. लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे. सुपारी देऊन बिले काढण्यासाठी मोर्चा आणल्याचे नागरिक जाणतात, असेही ते म्हणाले. नगरसेवक इनायत मुकादम सातत्याने कुरबुरी व आरोप करत असल्याबद्दल छेडले असता त्याच्याबद्दल काय बोलणार. त्यांचा स्वभाव सर्व जनतेला माहीत आहे. नगराध्यक्षांनी तिजोरी लुटली, असे त्यांचे म्हणणे आहे. नगराध्यक्षा स्वच्छ चारित्र्याच्या व पारदर्शक कारभार करणाऱ्या आहेत. हे जनतेला ठाऊक आहे. मुंबईत जातानाही त्या स्वत:ची गाडी घेऊन जातात. अशा नगराध्यक्षांवर आरोप करताना आपली योग्यता ओळखायला हवी. माझा पीए असताना त्याने काय काय प्रताप केले ते मला माहीत आहे. सात ते आठ महिने आणखी उड्या मारेल. पुढे काय करेल, असा प्रतिप्रश्नही कदम यांनी केला. भाजी मंडईच्या मूल्यांकनाबाबत ते म्हणाले, कमी खर्चात भाजी मंडई कशी उभी राहिली, असा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी केला आहे. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलातील रंगमंचासाठी १८ ते १९ हजार रुपये भाडे आकारण्याची शिफारस केली आहे. एवढे भाडे कोण देईल का? मग ते क्रीडा संकुल बंद राहील नाही तर काय? लोकांना वस्तुस्थिती माहीत नाही. परंतु, ज्यांना वस्तुस्थिती माहीत आहे तेही अपप्रचार करतात व पालिकेला बदनाम करतात हे अयोग्य आहे. चार वर्षे सुखाने संसार केल्यानंतर तुम्हाला आत्ताच साथ सोडावी असे का वाटले? किंवा आताच आघाडी बेकायदेशीर आहे, असे स्वप्न का पडले? हा सगळा प्रसिध्दीसाठीचा स्टंट आहे. या शहरातील जनता सुज्ञ आहे, असेही कदम म्हणाले. (प्रतिनिधी)रमेश कदम म्हणाले,इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाचे राजकारण केले जातेय.काहींनी भंगार विकले, त्याचे मूल्यांकन केले नाही.सुपारी देऊन बिले काढण्यासाठी मोर्चा आणला.वस्तुस्थिती माहीत असणारेच पालिकेला बदनाम करताहेत.चार वर्षे सुखाने संसार केल्यावर आताच का साथ सोडता?
धनादेश देऊनही सांस्कृतिक केंद्राच्या कामाला विलंब
By admin | Updated: December 10, 2015 00:52 IST