रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या पावत्या देण्यात आलेल्या नाहीत. मार्च संपल्यानंतर सहा महिने उलटले तरी अद्याप या पावत्या न मिळाल्याने शिक्षकवर्गामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षाच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या पावत्या अजूनही शिक्षकाच्या हाती न मिळाल्याने अनेक शिक्षकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुमारे १० हजार शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देतात. या शिक्षकांना इन्कम टॅक्स, प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घ्यावे लागल्यास त्यासाठी या पावत्यांची आवश्यकता असते. त्यानंतर मार्च महिना उलटल्यानंतर एक - दोन महिन्यात तरी मिळणे आवश्यक होते. मात्र, ही बाब शिक्षण विभागाकडून गांभीर्याने घेतली जात नसल्याचे शिक्षकवर्गाकडून सांगितले जात आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याकडे लक्ष देतानाच याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. काही अधिकारी तर शाळेत जाऊन शिक्षकांच्या कामाची तपासणी करण्यात मग्न असतात. हे काम करीत असतानाच प्रॉव्हिडंट फंडासारख्या महत्त्वाच्या बाबीकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त करीत सांगितले. मात्र, प्राथमिक शिक्षकांच्या भवितव्याचा प्रश्न व गरजेची बाब म्हणून अशा पावत्यांची गरज असताना या पावत्या त्यांना अद्याप मिळण्यास विलंब होत आहे. या प्रकारामुळे सर्व शिक्षकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)
प्रॉव्हिडंट फंड पावत्यांना विलंब
By admin | Updated: October 23, 2014 00:06 IST