रत्नागिरी : शहरातून हद्दपार केलेल्या दोन गुन्हेगारांना रविवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा पथकाने सडामिऱ्या येथून ताब्यात घेतले. रूपेश कमलाकर सावंत (वय ४०), राजेश कमलाकर सावंत (४०, रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) अशी त्या दाेघांची नावे असून, त्यांच्याविराेधात शहर स्थानकात १४१ महाराष्ट्र पोलीस कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सडामिऱ्या येथील दोघांना शहर पोलिसांकडून रत्नागिरी महसुली उपविभागाच्या हद्दीबाहेर ६ महिने कालावधी करता हद्दपार करण्यात आले हाेते़. रूपेश कमलाकर सावंत, राजेश कमलाकर सावंत हे दोघेही सतत एकत्र येऊन गुन्हे करत असल्याची बाब शहर पोलिसांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी या दोघांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकशीअंती दोघांना हद्दपार करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी याप्रकरणी स्वत: सुनावणी घेऊन २७ एप्रिल २०२१ या दोन्ही गुन्हेगारांना रत्नागिरी महसुली उपविभागाच्या हद्दीबाहेर ६ महिने कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ९ मे रोजी पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांना या दोघांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्याआधारे त्यांनी या कारवाई करण्याचे आदेश व मार्गदर्शन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला केले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार संदीप कोळंबेकर, शांताराम झोरे, सुभाष भागणे, संजय जाधव, पोलीस नाईक विजय आंबेकर, बाळू पालकर, उत्तम सासवे, अमोल भोसले यांनी रविवार, ९ मे रोजी रात्री सडामिऱ्या येथे या दोन्ही गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. सोमवार (१० मे) दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रणजित जाधव करत आहेत़.