देवरुख : पावसाने दमदार हजेरी लावल्याने यावर्षी तालुक्यातील पूरजन्य गावातील स्थिती वगळता अन्य गावांत पिकांची स्थिती समाधानकारक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अतिरिक्त पाऊस झाला आहे. सध्या वातावरण पिकासाठी पोषक असल्याने बळीराजा समाधान व्यक्त करत आहे.
कोरोना तपासणी
रत्नागिरी : तालुक्यातील बोंड्ये नारशिंगे ग्रामपंचायतीच्यावतीने २३ ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत क्षेत्र सुरक्षित राहावे यासाठी ॲन्टिजन, आरटीपीसीआर चाचणी तसेच लसीचे डोस देण्याचे नियोजन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार २३ ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अवैध जंगलतोड
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील वाघिवरे, बामणोली व बोरगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. तोडलेली झाडे, भरलेल्या गाड्या राजरोस गावातून जात आहेत. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही जंगलतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
चित्रशाळा गजबजल्या
गुहागर : कोकणातील लोकप्रिय गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे भक्तांना आता या उत्सवाचे वेध लागले आहेत. तालुक्यातील अनेक चित्रशाळांमधून आता विविध गणेशमूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. कोरोना सावटामुळे यंदाही लहान मूर्तींना अधिक प्राधान्य दिले जात आहे.
भटक्या जनावरांचा त्रास
दापोली : शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भटक्या जनावरांचा आणि श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बसस्थानक, दापोली-खेड मार्ग आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर ही जनावरे झुंडीने वावरत आहेत.
राखी प्रदर्शन
राजापूर : येथील पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि समावेशित शिक्षण अंतर्गत गटसाधन केंद्र येथे दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्या संकल्पनेतून विस्तार अधिकारी विनोद सावंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नागरिक संघातर्फे मदत
देवरुख : रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्यावतीने चिपळूण, खेर्डी आणि खेड परिसरातील गरजू पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. तिन्ही संघांना प्रत्येकी ६० हजार रुपये देण्यात आले होते. यातून या भागातील पूरग्रस्तांना ही आर्थिक मदत करण्यात आली.
स्वच्छता मोहीम
दापोली : तालुक्यातील पालगड येथे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण तसेच पायवाट स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दापोली विभागातून ९ दुर्गसेवक, चार दुर्गसेविका, मंडणगड विभागातून ७ दुर्गसेवक आणि १ दुर्गसेविका यांनी सहभाग घेतला होता. यावेळी वेगवेगळ्या ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
आरोग्य शिबिर
आवाशी : सामाजिक संस्था युसूफ मेहरअली सेंटर, बॉम्बे सर्वोदय फ्रेंडशिप सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने तळवटपाल, खेड आदी दुर्गम भागात पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मोफत शिबिराचा लाभ डोंगराळ भागातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी घेतला.
खड्ड्यांची समस्या कायम
मंडणगड : तालुक्यातील अनेक मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असल्याने नागरिकांना त्रासदायक होत आहे. आंबडवे - लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर म्हाप्रळ, चिंचाळी, तुळशी घाट, पाचरळ, आंबडवे या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत.