चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी येथील लसीकरण केंद्रास जिल्हा आरोग्याधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार लवकरच हे केंद्र सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच श्रेयवादाचे नाट्य सुरू झाले आहे.
खेर्डी गावची लोकसंख्या सुमारे २० हजारांपेक्षा अधिक आहे. अशा गावातील नागरिकांना कोविड लसीसाठी अडरे प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा अन्य ठिकाणी जावे लागते. अशा वेळी खेर्डीत लसीकरण परवानगी मिळावी यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यावरूनच येथे नवा श्रेयवाद रंगू लागला आहे. काही दिवसांपूर्वी युवा सेना तालुका अधिकारी उमेश खताते यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे या केंद्राची मागणी केली होती. तसेच आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, जिल्हा आरोग्याधिकारी व तालुका आरोग्याधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार खासदार राऊत यांनी जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करीत खेर्डी गावासाठी लसीकरणाची परवानगी देण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर उमेश खताते हे सतत पाठपुरावा करीत होते.
या लसीकरण केंद्रासाठी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आमदारांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोमवारपर्यंत याविषयीचा निर्णय होणार असल्याचे सांगितले होते. अशातच या केंद्राला मान्यता मिळाली असल्याने त्यावरून श्रेयवाद शिजू लागला आहे. लवकरच हे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी स्पष्ट केले आहे.