रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी लाखापेक्षा जास्त चाकरमानी आल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेले दहा दिवस दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमीच असल्याने, आता कोरोना आटोक्यात आल्याची आशा निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.
गतवर्षी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सप्टेंबर महिन्यात सापडले होते. अनंतचतुर्दशी झाल्यानंतर रुग्ण सापडण्याचे प्रमाण वेगाने वाढले होते. यंदाची अनंतचतुर्दशी रविवारी आहे. त्यानंतर रुग्ण वाढतील की कमी होतील, याचा अंदाज येणे अवघड आहे. पण सद्यस्थितीत मात्र दिलासा मिळण्याइतकी रुग्णसंख्या कमी झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेने सप्टेंबर महिन्यात टोक गाठले होते. ऑगस्टमध्ये गणेश चतुर्थी होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले. प्रवास करून आल्यानंतर अलगीकरणात राहण्याचा नियम असूनही अनेकांनी तो पाळला नाही. त्याचा परिणाम सप्टेंबर महिन्यात चांगलाच दिसून आला. त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यापासून पहिली लाट ओसरत गेली. दिवाळी, वर्षअखेर आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय चांगली झाली. मार्च महिन्यात शिमग्यादरम्यान कोकणात चाकरमानी आले आणि दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढली. तेव्हापासून जुलैपर्यंत रुग्णसंख्येने कहरच केला. ऑगस्टपासून ही रुग्णसंख्या मर्यादित झाली. रोजचा ५०० ते ६०० रुग्णांचा आकडा ऑगस्टमध्ये २०० पेक्षा कमीच होता.
यावर्षी सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी आल्याने लाखभरापेक्षा जास्त चाकरमानी कोकणात येणार, हे नक्की होते. सरकारने वर्तविलेल्या भीतीप्रमाणे तिसरी लाट या गर्दीमुळेच येणार की काय? अशी धाकधुक कोकणवासीयांच्या मनात होती. नातेवाईक गणपतीसाठी यावेत, ही इच्छा मनात असलेल्या कोकणवासीयांना कोरोना वाढण्याची भीतीही सतावत होती. मात्र ही भीती आतापर्यंत तरी खोटी ठरली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसात १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले. ७ सप्टेंबरला १५० रुग्ण आढळले होते. मात्र तेव्हापासून रुग्णसंख्या १०० पेक्षा कमीच आढळत आहे.
सप्टेंबरच्या १६ दिवसात १,१९७ रुग्ण आढळले आहेत. त्यातही पहिल्या ७ दिवसात ७४० आणि आठ सप्टेंबरपासून १६ पर्यंत केवळ ४५७ रुग्णच सापडले आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही चांगलीच घटली आहे. १६ दिवसात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण आणि मृत्यू दोन्हीची संख्या घटत असल्याने सध्या तरी कोरोनाचे सावट दूर होत आहे, अशी स्थिती आहे.
.............................
काय असावीत रुग्ण घटण्याची कारणे...
चाचण्या कमी
गेल्या काही दिवसात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याआधी दिवसाला चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात होत्या. कोरोनाची दुसरी लाट तीव्र असताना सात हजारपेक्षा जास्त चाचण्याही एका दिवसात झाल्या आहेत. मात्र आता ही संख्या दोन ते अडीच हजारापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे चाचण्या घटल्याने रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले असल्याचा अंदाज आहे.
..................
लसीकरण वाढले
गेल्या काही काळात लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्ह्यात आता दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या २ लाख ६३ हजाराहून अधिक झाली आहे. याआधी लस मिळण्याचे प्रमाण कमी होते. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात लसीचा पुरवठा चांगला केल्यामुळे आरोग्य यंत्रणेने त्यावर विशेष मेहनत घेतली आहे. एका दिवशी विक्रमी २६ हजारपेक्षा अधिक लसीकरणही झाले आहे. त्याचा परिणाम होऊन कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याची शक्यता आहे.
.................
चाकरमान्यांची तपासणी
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या लोकांना दोन डोस अथवा आरटीपीसीआर चाचणीचे बंधन घालण्यात आले होते. या दोनपैकी एकही गोष्ट नसलेल्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली. जिल्ह्यात आलेले चाकरमानी पाहता, या चाचणीत आढळलेल्या रुग्णांची संख्या नगण्य आहे. आलेल्या सर्वच मुंबईकरांची तपासणी झालेली नाही. मात्र बहुतांश लोकांची तपासणी झाली आहे. त्यामुळेही अजूनपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत नाही.
..................
भीती संपलेली नाही
अजूनही कोरोनाची भीती पूर्ण संपलेली नाही. आलेले पाहुणे अनंतचतुर्दशीला परत जातील. त्यामुळे तोपर्यंत धास्ती कायम राहणार आहे.