मंडणगड : कोरोनाची लागण रोखण्याकरिता देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणीसाठी स्थानिक आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोफत लसीकरण करण्यात येत असल्याने तालुकावासीयांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठाणकर यांनी केले आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावागावात आलेल्या मुंबईकरांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शनिवारी मंडणगड पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची सभा घेण्यात आली. ग्रामसेवकांना ग्रामरक्षक व ग्राम कृती दलांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक वाडीवरील नागरिकांची यादी तयार करून ती आरोग्य विभागाला द्यावी, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठाणकर, डॉ. पितळे, डॉ. सानप यांनी सूचित केले.
आरोग्य विभागाने तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हारे, म्हाप्रळ, आंबडवे, पेवे या ठिकाणी कोरोना लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.