खेड : तालुक्यात सद्यस्थितीत १३ ठिकाणी कन्टेनमेंट झोन कार्यान्वित आहेत. याठिकाणी आरोग्य यंत्रणेने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या २२३ वर पोहोचली आहे.
उपाध्यक्ष निवड
राजापूर : रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेच्या उपाध्यक्षपदी राजापूरचे कोतवाल आनंद आंबोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेच्या रत्नागिरी येथील बैठकीत ही निवड करण्यात आली. कोतवाल संघटनेतील अनेक विषयांबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पथदीप सुरू
जैतापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर परिसरातील अनेक महिने बंद असणारे पथदीप सुरू करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथदीप सेवा सुरळीत केल्याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. जैतापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वीजबिल थकीत असल्याने महावितरणने पुरवठा खंडित केला होता. काही रक्कम भरल्याने ही खंडित सेवा सुरू करण्यात आली आहे.
शुभम मुळ्ये याची निवड
जाकादेवी : फणसवळे येथील शुभम संदीप मुळ्ये याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.
मालकांवर होणार कारवाई
राजापूर : शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असून, नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राजापूर नगर परिषदेने मोकाट जनावरांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मोकाट जनावरे आढळल्यास त्यांना काेंडवाड्यात ठेवण्यात येणार असून, मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जनावरांचा रास्ता रोको
संगमेश्वर : महामार्गावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे महामार्गावर रास्ता रोको होत आहे. वारंवार तक्रार करूनही मोकाट जनावरांबाबत ठोस पाऊल उचलले जात नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
राज्य पुरस्काराने सन्मानित
खेड : कोल्हापूर येथील अविष्कार सोशल ॲण्ड एज्युकेशनल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार’ महसूल विभागाचे भरणे येथील मंडल अधिकारी सचिन गोवळकर यांना प्रदान करण्यात आला आहे. उत्तम प्रशासकीय सेवा व कोरोना काळातील कामगिरीची दखल घेत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसन कुराडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
५ पासून बसफेरी सुरू
खेड : खेड तालुक्यातील एम. जी. उपानेकर यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सव कालावधीत ५ सप्टेंबरपासून खेड - विरार अर्नाळा बसफेरी धावणार आहे. ही बस येथील स्थानकातून सकाळी ८.३० वाजता सुटून सायंकाळी ६ वाजता अर्नाळा येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात अर्नाळा विरार येथून रात्री ९.३० वाजता सुटून सकाळी ६ वाजता खेडला पोहोचेल.
जिल्हाध्यक्षपदी नीलेश नार्वेकर
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये सामाजिक काम करणाऱ्या संपर्क युनिक फाऊंडेशन एनजीओ, रत्नागिरी या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नीलेश नार्वेकर तर तालुकाध्यक्षपदी जमीर खलिफे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष शकील गवाणकर, सचिव युसुफ शिरगावकर उपस्थित होते.
आरसा बसविण्याची मागणी
लांजा : मुंबई - गोवा महामार्गावरील लांजानजीकच्या वेरळ घाटातील वळणे अतिशय धोकादायक आहेत. हा भाग अपघातप्रवण क्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. गेल्या सहा महिन्यांत याठिकाणी सहा अपघात झाले आहेत. वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा आरसे बसविण्यात यावेत, अशी मागणी लांजा तालुका व्यापारी संघटनेचे पदाधिकारी खलील मणेर यांनी केली आहे.