दापोली : येथील लाडघर गावात दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील हरित सेना आणि ग्रामपंचायत, लाडघर यांच्या संयुक्त विद्यमाने अशोकवन, पंचवटी आणि ‘गणेशवनाची’ उभारणी करण्यात आली.महावृक्षारोपण - २००७ मोहिमेचे शिल्पकार स्व. डॉ. अशोक पोवार यांची स्मृती जपण्यासाठी या अशोकवनाची उभारणी करण्यात आली. वृक्षांना देव मानून वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षांना पालखीत घालून महोत्सव साजरा करण्यात आला. हरित सेनेचे प्रमुख प्रा. संतोष वरवडेकर यांच्या संकल्पनेतून ३६ हरितमित्रांच्या साथीने ही मोहीम यशस्वी करण्यात आली. ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी लाडघर येथील प्रगतशिल शेतकरी आणि पोवार यांचे मित्र प्रसाद बाळ यांनी मोलाचे सहकार्य केले. अशोकवनामध्ये सीताअशोकाची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, पायर, उंबर आणि आंबा या पंचवटीची लावगडही करण्यात आली. तसेच गणेश वनाचीही उभारणी करण्यात आली.अशोक पोवार यांचे गुरु अशोक परांजपे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक निर्बाण यांच्याहस्ते गणेशवनात सीताअशोकाचे झाड लावण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, करजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक औताडे, सरपंच राजेश्वर सुर्वे आणि करजगाव हायस्कूलचे हरित सैनिक, प्रा. संतोष वरवडेकर आणि हरितमित्र यांच्याहस्ते सीताअशोकाची लागवड करण्यात आली. प्रगतशिल शेतकरी सुहास बाळ, प्रशांत परांजपे, उपसरपंच सुभाष बाळ, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ टेमकर, मंगेश पवार, समीर झगडे, कृषी सहायक दर्शना वरवडेकर, ग्रामसेवक संदीप सकपाळ उपस्थित होते. नाईल संस्थेचे संस्थापक मुनाफ वाडकर यांनी अशोकवनाचे डिझाईन बनवले आहे. सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शीतल नांगरे पाटील हिने स्वागत केले. प्रा. संतोष वरवडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
हरित सेनेकडून लाडघर येथे ‘अशोकवनाची’ उभारणी
By admin | Updated: August 17, 2014 22:34 IST