मंडणगड : काँग्रेस, राष्ट्रवादी, व रिपाइं हे तीन पक्ष मंडणगड नगरपंचायत निवडणुकांचा सामना महाआघाडीचे माध्यमातून करणार असल्याचे आमदार संजय कदम यांनी स्पष्ट केले. जागा वाटपाचा तिढा यशस्वीपणे सोडवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिंगळोली येथील कार्यालयात तिन्ही पक्षांच्यावतीने संयुक्तपणे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाआघाडीचा अजेंडा व शहर विकासाचे आगामी काळातील नियोजन याविषयी आघाडीची भूमिका विषद करण्यात आली़ रत्नागिरी जिल्ह्यातील नवनिर्मिती झालेल्या मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. नव्याने निर्माण झालेल्या या नगरपंचायतीवर पहिला झेंडा कोणाचा फडकणार याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपाइंने आघाडी केली आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी १०, काँग्रेस ५ तर रिपाइं २ जागा लढवणार आहे़ अनिश्चतता व वेगवेगळी समीकरणे साधून आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. निवडणुकांचे माध्यमातून सर्वसमावेशक नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला असल्याने सर्वच्यासर्व जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचे आघाडीकडून निश्चित करण्यात आले. आमदार संजय कदम यांनी शहरातील विविध समस्यांचा अभ्यास केला असून, शहर विकासाचे वेगळे नियोजन केले आहे. यात शहराचा पाणीप्रश्न प्रथम सोडवण्यात येणार आहे. कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी शहरात जागोजागी कचराकुंड्या, कचरा डेपो, घंटागाडी तसेच डंपींग ग्राऊंडचे नियोजन करण्यात येणार आहे़ व्यापार वृध्दी व पर्यटनातून रोजगार वाढीसाठी अनुकूल धोरण राबवण्यात येणार आहे. आगामी दोन वर्षात मागील अनुशेष भरुन शहराला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करणार असल्याचे कदम यांनी सांगितले. आगामी निवडणुका या आघाडीचे कार्यकर्ते अस्तित्वाची लढाई म्हणून लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, निरीक्षक संदेश कोंडविलकर, भाई पोस्टुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लोखंडे, दादासाहेब मर्चंडे, सुभाष तांबे, आदेश मर्चंडे, संतोष मांढरे, राजेंद्र लेंढे, रत्नप्रभा लेंढे, सुभाष सापटे, राहूल कोकाटे, विनीत रेगे, सुरक्षा शेट्ये, स्रेहल मांढरे व आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)आधी जनतेचे प्रश्न सोडवा : संजय कदम मंडणगड : दापोली मतदार संघात पंचवीस वर्ष सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने सभा जिंकण्यासाठी माझ्यावर टीका करण्यापेक्षा जनतेचे किती प्रश्न सोडवले याचा हिशोब जनतेला देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संजय कदम यांनी केले. मंडणगड येथे नगरपंचायतीसाठी उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले़ यावेळी आयोजित प्रचार सभेत आमदार संजय कदम यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्यर दिले़ मी मंजूर केलेली विकासकामे ही रितसर असल्याने त्यांचे नारळ नासके ठरणारे नसून सर्वच कामे लोकहिताची आहेत़ शासन आमचे आहे, असे सांगणारे पर्यावरणमंत्री काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात झालेल्या विकासकामांचे नारळ फोडून श्रेय घेतच होते. आमदार दळवी तर रात्रीचे नारळ फोडण्यासाठी प्रसिध्द होते. पर्यावरण मत्र्यांना गळ््यात गंडे, तावीज घालण्यापलीकडे काही सुचत नाही़ पक्षाच्या जिवावर मागच्यादाराने विधान परिषदेवर जाणाऱ्या पर्यावरण मंत्र्यांची पक्षनिष्ठा मागील लोकसभा निवडणुकीत गीतेंच्या विरोधात काम करताना कोठे होती? असा सवाल केला़ हातात सत्ता नसतानाही दापोली मतदार संघात काम करताना केवळ एका वर्षात पंचवीस कोटींची विकासकामे आणली आहेत. पंचवीस वर्ष जनतेला चुना लावणाऱ्या माजी आमदारांनी पंचवीस वर्षात किती निधी आणला याचाही खुलासा करावा़ मंडणगड तालुक्याचे जावई म्हणून मिरवणाऱ्या पर्यावरण मंत्र्यांच्या पालवणी या गावातील धनगरवाडी आजही लाईटपासून वंचित आहे. पर्यावरण मत्र्ंयाना ही विदारक स्थिती कळत नाही का? नावासाठी हपापलेले माजी आमदार शौचालयाच्या भिंतीवरही स्वत:चे नावे टाकण्यास विसरत नाहीत. ते निवडणुकीत पराभूत झाले आहेत हे वास्तव त्यांनी स्वीकारावे़ सभेस जिल्हा निरीक्षक संदेश कोंडविलकर जिल्हाध्यक्ष शेखर निकम, सुजाता तांबे, जयवंत जालगांवकर, सिंकदर जसनाईक, अजय बिरवटकर, सुलतान मुकादम, दादासाहेब मर्चंडे, आदेश मर्चंडे, प्रकाश शिगवण, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, विजय पोटफोडे, राजेश मर्चंडे, सखाराम मर्चंडे, संदेश चिले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाई पोस्टुरे यांनी केले़ (प्रतिनिधी)बोचरी टीका : पक्षाच्या जीवावर मागच्या दाराने विधानपरिषदेतआमदार संजय कदम यांनी यावेळी सूर्यकांत दळवी आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर बोचरी टीका केली. आमदार दळवी रात्रीचे नारळ फोडण्यासाठी प्रसिद्ध होते. पक्षाच्या जीवावर पर्यावरण मंत्री मागच्या दाराने विधानपरिषदेत गेले आहेत. आम्हाला थेट जनतेने निवडून दिले असल्याचे संजय कदम म्हणाले.पक्षनिष्ठा तेव्हा कोठे होती?लोकसभा निवडणुकीत रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यातील हेवेदावे जनतेसमोर आले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत अनंत गीतेंच्या विरोधात काम करणाऱ्या रामदास कदम यांची पक्षनिष्ठा तेव्हा कोठे होती? असा खणखणीत सवाल संजय कदम यांनी यावेळी केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं महाआघाडी
By admin | Updated: October 9, 2015 21:19 IST