सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सोमवारी झालेल्या ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या निवडीत १९ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसचे सरपंच विराजमान झाले आहेत. ११ ग्रामपंचायतींवर सरपंच देणारी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर भाजप आणि ग्रामविकास पॅनेलच्या वर्चस्वाखाली प्रत्येकी ५ ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीकडे एक, पाटथर ग्रामपंचायत सरपंच निवड झाली नाही, तर आरोंदा ग्रामपंचायतीत गावविकास पॅनेल की शिवसेना यांच्यात संभ्रम आहे.सावंतवाडी तालुक्यात एप्रिल महिन्यात झालेल्या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले आहेत, तर दोन ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व ठेवले आहे. आरोंद्यात मात्र गाव विकास पॅनेल की शिवसेना यात संभ्रम निर्माण झाला असून, प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोलगाव, आंबोली व तळवडे येथे सरपंचपदी आपल्या पक्षाचे सदस्य विराजमान झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मालवण तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर काँग्रेसने तर दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे विराजमान झाले. सोमवारी तालुक्यातील सातही ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. बहुमतातील मसुरे-डांगमोडे, पेंडूर, कुणकवळे, गोळवण,( सर्व काँग्रेस), आडवली (काँग्रेस -राष्ट्रवादी) तर मसदे चुनवरे व चिंदर याठिकाणी शिवसेना असे बलाबल तालुक्यात दिसून आले.देवगड तालुक्यात झालेल्या २३ ग्रामपंचायतींपैकी पाटथर या ग्रामपंचायतीत तांत्रिक अडचणीमुळे सरपंच निवड झाली नाही. तर उर्वरीत २२ पैकी काँग्रेसकडे १0, भाजप ५, ग्रामविकास पॅनेलकडे ५, राष्ट्रवादी, शिवसेनेकडे प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल राहिले. तोंडवली-बावशी गु्रप ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत सुप्रिया रांबाडे यांची बिनविरोध निवड झाली. तर भिरवंडे, गांधीनगरमध्ये कॉँग्रेसचे सरपंच विराजमान झाले. (प्रतिनिधी)दक्षिणेत शिवसेना उत्तरेत कॉँग्रेस सावंतवाडीतील दहा ग्रामपंचायतींपैकी सात ठिकाणी शिवसेनेचा सरपंच विराजमान झाल्याने तेथे शिवसेनेचे पर्यायाने पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्राबल्य दिसून आले. तर मालवण, देवगड, कणकवली तालुक्यात कॉँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. पाटथरमध्ये तांत्रिक अडचण देवगड तालुक्यात झालेल्या २३ ग्रामपंचायतींपैकी पाटथर या ग्रामपंचायतीत तांत्रिक अडचणीमुळे सरपंच निवड झाली नाही. ही राखून ठेवण्यात आलेली निवड पुन्हा घेतली जाणार आहे.
सरपंच निवडीत कॉँग्रेसचे वर्चस्व
By admin | Updated: August 4, 2015 00:09 IST