रत्नागिरी : लसच्या अपुऱ्या साठ्याबरोबरच कमी येणाऱ्या पुरवठ्यामुळे त्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाची होणारी तारांबळ यामुळेे गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा गोधळ कायम आहे. त्यातच आता १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्याने या गोंधळात अधिकच भर पडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात सर्वत्रच लसीच तुटवडा जाणवू लागला आहे. १५ जानेवारीपासून लसीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर कोमाॅर्बिड व्यक्तींना लसीकरण सुरू झाले. मात्र, काही दिवसातच ६० वर्षांवरील व्यक्तींना आणि पाठोपाठ सरसकट ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव याच कालावधीत वाढल्याने त्यानंतर मात्र लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली. लसीचा पुरवठा कमी आणि लस घेणाऱ्यांची संख्या जास्त यामुळे लस आल्यानंतर ती किती जणांना द्यायची, याबाबत आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाला आहे. आधीच लस अपुरी, त्यातच आता २ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाही सरसकट लस देण्यास सुुरुवात झाली आहे.
याआधी जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे होती. आता ती कमी करून ती आता केवळ १४ करण्यात आली आहेत. दिवसाला केवळ १०० ते २०० इतपत डोस या केंद्रांमध्ये वितरीत होत आहेत. त्यामुळे नागरिक ते मिळविण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून केंद्रांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या नियोजनाचा पूर्णत: बाेजवारा उडाला आहे. त्याचबरोबर सकाळपासून डोससाठी येणाऱ्या नागरिकांचीही रखडपट्टी होत असल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेतील घोळ कायम आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य नियोजन करूनच ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चौकट
उपलब्धतेनुसार टोकन
प्रत्येक लसीकरण केंद्रावर प्रत्येक दिवसासाठी जेवढे डोस उपलब्ध होतील, त्याची माहिती बाहेर फलकावर लावावी. वयाेगटानुसार प्राधान्य क्रम ठरवून टोकनप्रमाणे लस देण्यात यावी.
वयोगटानुसार प्राधान्य द्यावे
मधुमेही, रक्तदाब आदी गंभीर आजार असलेल्या व्यक्ती किंवा ६० वर्षांवरील व्यक्ती यांना प्राधान्यक्रमाने लस मिळावी. त्यानंतर कमी वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात यावी. असं नियोजन केल्यास नागरिक गर्दी करणार नाहीत.
योग्य नियोजन हवेच
रत्नागिरी शहरातील तीन लसीकरण केंद्रात सकाळी ९ ते ३ या वेळेत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी तर त्यानंतर ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. मात्र, प्रत्येक केंद्रांवर किती डोस आले आहेत, हे माहीत नसल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांची सकाळी ७ वाजल्यापासूनच गर्दी झाली. त्यातच जेष्ठ नागरिकांंना भरदुपारी बोलावल्याने अनेकांना उन्हात उभे रहाण्याची वेळ आली. हजारोंची गर्दी आणि लस कमी, यामुळे नागरिकांचा संयम सुटला. अखेर पोलीस कुमक मागवावी लागली. यात ज्येष्ठ नागरिकांना धक्क्काबुक्कीही झाली. एवढे होऊनही काहींना लस मिळालीच नाही. त्यामुळे याबाबत योग्य नियाेजन होणे गरजेचे आहे.
नागरिकांचा संयमही महत्त्वाचा
सध्या कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. सध्या अपुरे मनुष्यबळ असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आहेच. अशातच लस मिळविण्यासाठी लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता कोरोनाचा प्रसार वाढवू नये. यासाठी त्यांचाही संयम महत्त्वाचा आहे.
कोटसाठी
रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथे १८ ते ४४ आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी मंगळवारी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ठेवला होता. मात्र, सकाळी १८ वरील आणि भरदुपारी ४५ वरील नागरिकांना डोस देण्यात आला. डोस अतिशय कमी होते. मात्र, त्याची कल्पना नागरिकांना नसल्याने या केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून लस घेणारे आणि त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली. मात्र, ज्येष्ठांना उन्हात अनेक तास उभे रहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. खरतर दोन्ही वयोगटासाठी लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र ठेवायला हवे होते.
सुखदा सारोळकर, संचालिका लर्निंग पाॅईंट, रत्नागिरी