लांजा : ग्रामीण महाराष्ट्र अर्थात संग्राम व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मानधनाचा तिढा अद्याप कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै व ऑगस्टचे मानधन अद्याप देण्यात न आल्याने संगणक परिचालकांवर ऐन गणेशोत्सवात उपासमारीची वेळ आली आहे.
डिजिटल महाराष्ट्राचे काम करणारे संगणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी दाखले, बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल अशा सर्व २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतीच्या संपूर्ण जमा - खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, १४ व १५ व्या वित्त आयोगाचा गावविकास आराखडा यासह ग्रामपंचायत ‘सांगेल ते काम’ करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी, अस्मिता योजना, जनगणना, घरकुल सर्व्हे, प्रधानमंत्री पीक विमा योजना इत्यादी प्रकारची महत्त्वपूर्ण कामे करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्या अद्याप दुर्लक्षित आहेत. अशाच वेळी ऐन गणेशोत्सवात दोन महिन्यांचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही.
वास्तविक गणेशोत्सव असल्याने मानधन वेळेवर मिळणे आवश्यक होते. सणासुदीच्या काळातही उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, लोकसंख्येच्या आधारावर संगणक परिचालकांची नियुक्ती केली आहे. जिल्हाभरात ५५० संगणक परिचालक कार्यरत आहेत.
राज्य शासनाने यासाठी आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना केली आहे. केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगामधून १० टक्के रक्कम संगणक परिचालकांचे मानधन व ग्रामपंचायतींना लागणारी स्टेशनरी पुरविण्यासाठी या केंद्राला जमा करावे लागते. मात्र, संबंधित कंपनीकडून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मानधन व स्टेशनरी दिलेली नसल्याचे संगणक परिचालकांनी म्हटले आहे.