- शाळा बंद मात्र शिक्षण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. प्रत्यक्ष वर्ग भरविणे शक्य नसल्याने शाळांचे अध्यापन ऑनलाईन सुरू आहे; मात्र काही ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत मुलांपर्यंत शिक्षणाचा वसा विविध मार्गाने पोहोचवत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे घेवडेवाडी या गावातील प्राथमिक शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील आहेत.
जिल्ह्यातील शाळांमध्ये Online/off-line च्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. शहरात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सोयीस्कर होत असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. शिवाय मोलमजुरी करणाऱ्या पालकांकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे वाड्या-वस्ती, दुर्गम भागात वसलेल्या वाडीतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचणे जोखमीचे झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील ‘पिरंदवणे-घेवडेवाडी’ गावातील प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लोकसहभागातून संगणकाद्वारे अध्यापन सुरू केले आहे.
मुख्याध्यापक कपिल तडखेले व शिक्षक सतीश निकुंभ यांनी लोकसहभागातून, पिरंदवणे ग्रामपंचायतीच्या मदतीने शाळेसाठी एक संगणक व डोंगल मिळविला आहे. गावात सर्व ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे नेटवर्क उपलब्ध झालेल्या ठिकाणी हा संगणक व डोंगल जोडण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक ठरवून त्या विद्यार्थ्यांना वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग वापर करून संगणकासमोर बसून अध्यापन करीत आहे. याशिवाय सतीश निकुंभ नेटवर्क मिळेल अशा ठिकाणाहून स्वत:च्या मोबाईलवरून गुगल- मीटद्वारे मुलांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. दररोज एक तास एका वर्गासाठी अशा प्रकारे सर्व वर्गासाठी अध्यापन सुरू आहे.
पिरंदवणे घेवडेवाडी शाळेत १७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन शाळेत हजेरी लावून दररोजचा अभ्यास करत आहेत. शिक्षक व ग्रामस्थ यांनी घेतलेल्या या मेहनतीतून विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ- पालक, शिक्षकांचे कौतुक केले आहे.