गुहागर : सव्वीस वर्षीय विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तालुक्यातील कोळवली गावच्या सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित आरोपीस मदत करणाऱ्या ग्रामसेवकासह आणखी तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पीडित महिलेने गुरुवारी गुहागर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार कोळवली गावचा सरपंच प्रकाश तानू भुवड याने या विवाहितेस तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून ३१ मे २०१५ रोजी पळवून नेले. याबाबत विवाहितेच्या नातेवाइकांनी ती बेपत्ता असल्याबाबत गुहागर पोलिसांत फिर्याद दिली होती. तिला सांगली येथे एक दिवस व मिरज येथे चार दिवस ठेवण्यात आले. या ठिकाणी प्रकाश भुवड याने तिच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. तसेच ही घटना कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. हा प्रकार दि. ३१ मे ते ६ जुलै या कालावधीत घडला. नंतर ती महिला घरी परतली. या महिलेला दोन मुली आहेत. आपला संसार मोडू नये, यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांकरवी तोडगा काढण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने महिलेने गुरुवारी फिर्याद दाखल केली. या सर्व प्रकरणात ग्रामसेवक सुनील गरंडे याने संशयितास मदत केली. गरंडे याच्यासह मदत करणाऱ्यात अन्य तीन अनोळखी व्यक्तींचाही समावेश आहे. या सर्व पाचहीजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी गुरुवारी दुपारी या प्रकरणी भेट दिली. (वार्ताहर)
कोळवली गावच्या सरपंचावर गुन्हा दाखल
By admin | Updated: July 10, 2015 01:09 IST