आवाशी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महार्गावर जणू काही ताबाच मिळविला असल्यासारखी वाहने उभी केली जात आहेत. याकडे महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने ही कंपनी अपघातास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया पंचक्रोशीतून व्यक्त केली जात आहे.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणचे अर्धवट स्थितीतील काम वाहन चालकांस त्रासदायक ठरत आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका येथील लोटे परशुराम वसाहतीमधून जाणाऱ्या मार्गांवर लगतच असणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीसमोर कंपनीत येणारी व जाणारी मालवाहू अवजड वाहने बिनधास्तपणे महामार्गावरच उभी केली जात आहेत. त्याचा वाहतुकीस अडथळा हाेत आहे. येथे अपघातास निमंत्रण देण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, या नेहमीच्या समस्येकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
कंपनीत २ जून २०२१ राेजी येणारा टँकर मागे घेण्याच्या प्रयत्नात असताना व टँकर चालकासोबत वाहक नसल्याच्या कारणाने याच महामार्गावर व कंपनीसमोरच रस्त्याने चालत असणारा चिंचवली, खेड येथील अभिजित अ. पवार या तरुण कामगाराचा टँकरखाली चिरडून मृत्यू झाला हाेता. त्यावेळी तो आवाशी येथे राहात होता. मात्र, यातूनही संबंधित कंपनीने बोध घेतलेला नाही. जणू काही महामार्गही आपल्याच मालकीचा असल्यासारखे दररोज येथे येणारी वाहने उभे करून दाखविले जात आहे. याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आणखीही कुणाचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.