रत्नागिरी : येथील भारतीय तटरक्षक अवस्थानतर्फेआंतरराष्ट्रीय बंदर स्वच्छता दिनाचे औचित्य साधून सामान्य जनतेच्या मनात सागर किनारा स्वच्छतेने पर्यावरण संवर्धनाचे बीज रूजविण्यासाठी भाट्ये किनाऱ्यावर ‘स्वच्छता मोहिम’ आयोजित करण्यात आली होती. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीमित्रांच्या सहाय्याने भाट्ये किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. सागरी व किनारी वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे संरक्षण व्हावे त्याचबरोबर तेथील प्रकृतीचे अस्तित्व अबाधित रहावे यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय बंदर स्वच्छता दिन दि. १९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यादिवशी प्राधान्याने समुद्रकिनारे, बंदरे स्वच्छ करण्यात येतात. यंदाही भाट्ये बीचची शनिवारी सकाळी स्वच्छता करण्यात आलीे. भारतीय तटरक्षक अवस्थानचे कमांडर एस. एम. सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, फिनोलेक्स कंपनीचे डॉ. आशुतोष मुळ्ये स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेत नवनिर्माण स्कूल, माने इंटरनॅशनल स्कूल, शिर्के प्रशाला, देसाई स्कूल, पटवर्धन हायस्कूल, गोदूताई जांभेकर विद्यालय, फिनोलेक्स इंजिनिअर कॉलेज, गोगटे -जोगळेकर महाविद्यालय, इकरा पब्लिक स्कूल, दोन महाराष्ट्र नेव्हल युनिटचे छात्र सहभागी झाले होते. यावेळी ४०० टन कचरा गोळा करण्यात आला. यासाठी जिल्हा रूग्णालयाने रूग्णवाहिका व नगरपरिषदेने घंटा गाडी दिली होती. सहभागी विद्यार्थ्यांना भारतीय तटरक्षक दलातर्फे प्रशंसापत्र हस्ते देण्यात आले. (प्रतिनिधी)
तटरक्षक दलातर्फे किनारा स्वच्छता मोहीम
By admin | Updated: September 20, 2015 00:02 IST