रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पूर्ण सहमत आहेत. मात्र खासदार विनायक राऊत यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. आता त्यांचे कशा प्रकारचे प्रबोधन करायचे ते आपण पाहू, असे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरीतील भाजप जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपच्या जनआशीर्वाद अभियानाची माहिती या वेळी देण्यात आली. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की, जेथे जास्तीत जास्त पुनर्वसन करावे लागणार नाही, अशा ठिकाणी रिफायनरी व्हावी. बारसू येथे एमआयडीसी जाहीर करण्यात आली आहे. त्याच्या आजूबाजूच्या गावातील ८ ते १० हजार एकर जागा घेऊन रिफायनरी करण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे जठार यांनी सांगितले. कोकणाच्या विकासाची उंची येथील समुद्राच्या खोलीत आहे. त्यासाठी कोकणातील राजकारण्यांनी समुद्राच्या खोलीत जाऊन आपल्या विचाराची खोली वाढवावी, असा सल्लाही जठार यांनी राजकारण्यांना दिला.
ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशीर्वाद घेण्यासाठी आणि कोकण विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा महत्त्वाची आहे. त्यात चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार आहे. ते १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत ही यात्रा करणार आहेत. ९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ आणि सुमारे १ हजार किलाेमीटरची ही यात्रा असेल. या यात्रेमध्ये आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह २०० जण सहभागी होणार आत्त. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, लोकसभा मतदारसंघ प्रमुख अतुल काळसेकर, राजेश सावंत, भाजप युवा माेर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, सचिन करमरकर, उमेश कुळकर्णी, राजू भाटलेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार व अन्य उपस्थित होते.