सागर पाटील - टेंभ्ये -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान सध्या शाळांमधून जोरात सुरु आहे. या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळास्तरावर करण्यात येणार आहे. या उपक्रमामधून शाळास्तरावर वयोगटानुसार दोन क्रमांक काढले जाणार आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, माध्यमिक शाळांमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमाच्या आयोजनाची धावपळ सुरु आहे. शाळा स्वच्छ व सुंदर व्हाव्यात, यादृष्टीने शिक्षण विभाग या अभियानांतर्गत विशेष प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. शाळा स्तरावर स्वच्छतागृह, वर्गखोली, क्रीडांगण, स्वयंपाकगृह, पाण्याची सोय, अभिलेख वर्गीकरण या घटकांची याअंतर्गत पाहणी केली जाणार आहे. तसेच स्वच्छतेसंदर्भात शाळास्तरावर पथनाट्य, प्रभातफेरी, जनजागृतीचे उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. शाळा स्तरावरील अभिलेखांचे वर्गीकरण करुन योग्य त्या साहित्याचे निर्लेखन करणे अपेक्षित आहे. या माध्यमातून कार्यालयीन कागदपत्रांची स्वच्छता अपेक्षित आहे. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत आवश्यक वाटल्यास शाळांना रंगरंगोटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक वाटल्यास शाळेच्या नावाचा बोर्ड रंगवून सुशोभित करणे अपेक्षित आहे.स्वच्छतेसंदर्भात करावयाच्या जनजागृती मोहिमेसाठी शाळांनी युवक मंडळे, लोकप्रतिनिधी, क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था, शाळा व्यवस्थापक समिती यांचा सहभाग घेऊन जनजागृती मोहीम अधिक व्यापक करणे अपेक्षित आहे. शाळांनी स्वच्छता मोहीम राबवण्यापूर्वीचे दोन व स्वच्छता अभियानानंतरचे दोन फोटो शाळा स्तरावर ठेवणे आवश्यक आहे. यामुळे या मोहिमेअंतर्गत नेमका काय बदल झाला, हे पाहणे शक्य होणार आहे. तसेच शाळांनी स्वच्छता मोहिमेमध्ये किती क्रीयाशील सहभाग घेतला हे निश्चित होणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या समित्यानी शाळांना भेट देऊन पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान शाळांमधील स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यात येत आहे. शाळांमध्ये स्वच्छतेचा दैनंदिन उपक्रमशाळांमध्ये शालेय परिसर, वर्गखोल्या यांची दैनंदिन स्वच्छता केली जाते. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये या उपक्रमासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नसल्याचे बोलले जात आहे. शाळांव्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केले.विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही देणार लक्ष.दि. १४ ते १९ दरम्यान शाळा स्तरावर होणार मूल्यमापन.मोहिमेत माध्यमिक स्तरावरील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन.माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे देणार लक्ष. शाळांसाठी दिली नवीन. कार्यप्रणाली.
शाळांमध्ये स्वच्छ भारत अभियान !
By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST