देव्हारे : मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ म्हाप्रळ येथील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फक्त एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या या दोन वर्गांची विद्यार्थी संख्या छप्पन्न आहे. या दोन वर्गांसाठी दोन महिन्यांपासून फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे. याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना असूनही, ते या गोष्टीकडे कानाडोळा करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी. यापूर्वी या शाळेवर कार्यरत असणारे शिक्षक नेहमीच विविध वादग्रस्त ठरले. हे शिक्षक मुलांना शिकवत नसत, तसेच काही विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत होते. शाळेवर वेळेत हजर न राहणे, मुलांना लाथाबुक्क्यानी मारहाण करणे तसेच पोषण आहार व पूरक आहार व्यवस्थित न पुरवणे अशा अनेक कारणांनी ते वादग्रस्त ठरले होते. यामुळे येथील ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाची बदली करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मागणी केली होती. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. शिक्षण विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यामध्येही ते दोषी आढळून आले होते. त्यामुळे सध्या सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांना अन्य शाळेवर कामगिरी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या रिक्त झालेल्या म्हाप्रळ शाळेच्या जागेवर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे दोन वर्गांना शिकविण्याची जबाबदारी एका शिक्षकावर आहे.त्यामुळे येथील सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता, गटशिक्षणाधिकारी हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हाप्रळ येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुलांच्या शैक्षणिक नुकसानास गटशिक्षणाधिकारीच जबाबदार असल्याचे येथील पालकांचे ठाम मत आहे. या शाळेला लवकरात लवकर सहावी आणि सातवीसाठी शिक्षक मिळावा व गटशिक्षणाधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर) एकीकडे मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्याचे धोरण अवलंबिले जात आहे, तर दुसरीकडे शाळेतील शिक्षकांच्या संख्येकडे कोणाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.म्हाप्रळ येथील प्रकारइयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक.दोन महिन्यांपासून एकच शिक्षक कार्यरत.गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रकाराकडे दुर्लक्ष.वादग्रस्त शिक्षकाची अन्यत्र रवानगी केल्याने अडचण.
वर्ग दोन अन शिक्षक मात्र एकच!
By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST