चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाला असली, तरी चिपळूण तालुक्याला कामगार मंत्रीपदाची दुसऱ्यांदा संधी मिळत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात पी. के. सावंत, हुसेन दलवाई व आता भास्कर जाधव यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली आहे. यातील दलवाई व जाधव चिपळूण तालुक्याचे सुपुत्र आहेत तर पी. के . तथा बाळासाहेब सावंत यांची चिपळूण ही कर्मभूमी राहिली आहे. १९९९ मध्ये राज्यात प्रथमच बिगर काँग्रेसी म्हणजे शिवसेना— भाजप युतीचे शिवशाही सरकार सत्तेवर आले होते. या मंत्रीमंडळात सेनेचे साबिर शेख हे कामगार मंत्री होते तर विद्यमान मंत्री भास्कर जाधव हे सेनेचे आमदार व सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख होते. १९९९ मध्ये सत्तांतर झाले आणि काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या मंत्रीमंडळात मिरजोळी येथील हुसेन दलवाई यांना कामगार मंत्री म्हणून संधी मिळाली.२००९ नंतर मंत्री पदाच्या अदलाबदलीत हे खाते राष्ट्रवादीकडे गेले आणि हसन मुश्रीफ या खात्याचे मंत्री झाले. जाधव हे गुहागर मतदार संघातून निवडून आले असले तरी ते चिपळूणचे सुपुत्र आहेत. त्यामुळे या खात्याचे मंत्रीपद आता चिपळूणच्या भास्कर जाधव यांना मिळाले असल्याने चिपळूणकरांसाठी ही दुसऱ्यांदा संधी आहे. (प्रतिनिधी)
चिपळूणला दुसऱ्यांदा कामगार मंत्रीपदाची संधी
By admin | Updated: July 1, 2014 00:13 IST