पाटण : पाटण तालुक्यातून जाणाऱ्या कऱ्हाड ते चिपळूण या कोकणाला जोडणाऱ्या राज्यमार्गावरून अनेक प्रकारची चोरटी वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो व इतर वाहने सुसाट धावत असतानाही पोलीस यंत्रणा व वनविभागाच्या तपासणी नाक्यावर कारवाई होताना दिसत नाही. विशेषत: रात्रीच्या वेळी हा मार्ग अशा अवैध वाहतुकीमुळे चर्चेत येऊ लागला आहे. हा मार्ग लाकूड, वाळू व पाळीव जनावरांच्या तस्करीचा ‘स्मगग्लिंग झोन’ बनलाय अशी जोरदार चर्चा आहे.कोकणमधील गुहागर ते पंढरपूर-जत हा राज्यमार्ग कोकणाचा दुवा आहे. या मार्गावर कऱ्हाड, पाटण, चिपळूण हे तालुके प्रामुख्याने अवलंबून आहेत. हल्ली या मार्गावरून प्रवासी वाहतुकीबरोबर लाकूड, वाळू व पाळीव जनावरांची चोरटी वाहतूक करणारे ट्रक बिनधास्तपणे धावत असतात. प्रवाशांची सुरक्षितता व अवैध वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी या मार्गावर कऱ्हाड, पाटण, कोयना, पोफळी येथे वनविभागाचे तपासणी नाके आहेत. तर कुंभार्ली घाटातून जाणाऱ्या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी घाटमाथ्यावर शिरगाव (चिपळूण) पोलिसांनी ठाण मांडलाय; मात्र येथे नेमणुकीस असलेल्या पोलिसांना रात्र कधी होतेय, असे वाटत असते. कारण रात्रीच्या वेळी स्मग्लिंग करणारे ट्रक कुंभार्ली घाटातून राजरोसपणे ये-जा करतात. चेक पोस्टवर आडव्या येणाऱ्या खाकी वर्दीवाल्याच्या हातात चालता-बोलता नोट घातली की, मार्ग मोकळा होतो; असा सर्रास पायंडा पडलेला आहे. रक्कम गोळा झालीच पाहिजे, हे एकमेव टार्गेट रात्री ड्यूटीवर असणाऱ्या पोलिसांचे असते. त्यामुळे चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होत नाही. काहीशी अशीच गत वनविभागाच्या चेक नाक्यांची आहे. लाकूड तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि वन कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याअगोदरच सेटलमेंट झालेली असते, असे आजही ठामपणे सांगण्यात येते. त्यामुळे वनविभागाच्या चेक नाक्यावरील कर्मचारी रात्रभर खुर्चीत बसून बघ्याची भूमिका घेताना दिसतात. पाटण तालुक्यात तर वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक करणारे ट्रक पहाटेच्या सुमारास कऱ्हाड, सांगलीकडे रवाना होताना दिसतात. (प्रतिनिधी)अनेक वाहने धावतात...अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली या मार्गावरून दूध वाहतूक करणारी वाहने धावतात. दूध गोळा करणाऱ्या संस्था या वजनदार नेत्यांच्या आश्रयाखाली असल्यामुळे अगोदरच पोलिसांना कानपिचक्या दिलेला असतात, किंवा त्यांचे समाधान केलेले असते. त्यामुळे अशा वाहनांकडे पोलीस कानाडोळा करताना दिसतात. कारखान्याच्या मळीची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होते.
चिपळूण मार्ग ‘स्मगलिंग झोन’...
By admin | Updated: July 8, 2015 22:01 IST