चिपळूण : पावसाळा सुरु झाल्यानंतर वाळू उत्खनन व वाहतूक बंद व्हायला हवे. परंतु, राजरोस वाळू उत्खनन व वाहतूक सुरु असल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालुस्ते व गोवळकोट येथे बुधवारी धाड टाकून १७५ ब्रास वाळूचे साठे पकडले. १५ जणांना ५ लाख ६० हजार रुपये दंड करण्यात आला. कालुस्ते, गोवळकोट परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरु असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार बुधवारी दुपारी ३ वाजता महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व तलाठी यांनी चायना गेट, गोवळकोट धक्का व कालुस्ते खुर्द जांभूळ कोंड येथे छापा टाकला. चायना गेट येथून १५० ब्रास, तर जांभूळ कोंड येथून अन्वर जबले यांची २५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. यापोटी ५ लाख ६० हजार रुपयांचा दंड व स्वामीत्वधन आकारण्यात आले. महसूल विभागाने तहसीलदार पाटील यांच्या आदेशानुसार अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कडक कारवाई सुरु केली आहे. जून महिन्यात माती, खडी व वाळूच्या २३ गाड्या पकडून ५ लाख ७४ हजार ५० रुपये दंड करण्यात आला. जुलै महिन्यात आजअखेर वाळू व खडीच्या ५ गाड्या व १७५ ब्रास वाळू साठा मिळून ६ लाख ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. दरम्यान, चिपळूण तालुक्यात एकाचवेळी करण्यात आलेल्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. भरारी पथकाची केली स्थापनाउंब्रजहून मोठ्या प्रमाणावर वाळू चिपळूणमध्ये येते. याकडे निवडणूक व दैनंदिन काम यामुळे आमचे थोडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, आता आम्ही त्याकडे कठोर लक्ष देणार आहोत. वाहन तपासणी व अवैध साठे जप्त करण्यासाठी आम्ही भरारी पथक स्थापन केले आहे. कारवाई अधिक कडक करणार आहोत, असे तहसीलदार वृषाली पाटील यांनी सांगितले. ५ लाख ६० हजार रुपये दंड. जून व जुलै महिन्यातील कारवाईपोटी १२ लाख ९ हजार ५० रुपये दंड वसूल. महसूल विभागाची धडक कारवाई. आता उंब्रजहून येणाऱ्या वाळूला लावणार टाच. तहसीलदार वृषाली पाटील यांनी अवलंबिले कडक धोरण.चिपळूण तालुकाभरात केलेल्या कारवाईचे सामान्यजनांकडून स्वागत.(प्रतिनिधी)
चिपळूण- गोवळकोट, कालुस्तेत वाळू साठे जप्त
By admin | Updated: July 11, 2014 00:04 IST