लाॅकडाऊन रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन चिपळूण भाजपतर्फे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे देण्यात आले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : नव्याने जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊन, तसेच कठोर नियमांमुळे सामान्य जनता, तसेच व्यापारी वर्ग यांमध्ये असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पावले उचलून लॉकडाऊन रद्द करीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा, अन्यथा चिपळूण व्यापारी संघाला पाठिंबा देत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा येथील भाजपने एका निवेदनाद्वारे दिला आहे.
याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. गुरुवारी या निवेदनाची प्रत नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे दिला.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे राज्य शासनाने आठवडा अखेरीस लॉकडाऊन, तसेच अनेक कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इतर पाच दिवसही लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनतेत व व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. लॉकडाऊनच्या कडक निर्बंधामुळे त्यांच्या व्यवसायाची घडी बसविणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे समाजातील छोटे घटक, तसेच व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्यांना कडक निर्बंधातून दिलासा देण्यात यावा. या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही आपल्या सोबत आहोत. आपण सर्वांनी मिळूनच ही कोरोना विरुद्धची लढाई जिंकायची आहे. परंतु, सर्वांना विश्वासात घेऊन गरिबांचे जीवन आणि अर्थचक्र दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने कोरोनाबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू उपस्थित होते.