खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहनाने, एस. टी. बस, खासगी आराम बसने चाकरमानी गावी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे सुरक्षित आणि सुखाचा व्हावा, यासाठी प्रवाशांना चहा बिस्किटे देऊन पोलीस दलाच्या वतीने प्रवाशांचे जंगी स्वागत केले जात आहे.
पोलीस दलाकडून कशेडी चेक पोस्ट, तुळशी फाटा, हॅपी सिंग धाबा, भाऊचा धाबा, धामणदेवी येथे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कशेडी चेक पोस्ट येथे चाकरमान्यांची वाहने थांबवून विचारपूस करून पुढील प्रवासासाठी पोलीस दलाच्यावतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत. प्रवाशांना अडचणी किंवा मदतीची गरज असल्यास पोलीस तपासणी केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केले आहे.
महामार्गावर खेड तालुक्याच्या हद्दीत पाच ठिकाणी रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था करण्यास आली आहे. महामार्गावर सतत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास वा अपघात झाल्यास तत्काळ मदत मिळावी व वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांची, वाहन चालकांनी गैरसोय होणार नाही याची काळजी येथील पोलीस घेत आहेत. संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी करीत आहेत.