रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील युतीमधील धूसफूस गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मुदत संपल्यानंतरही सेनेसाठी पद रिक्त केलेले नाही. त्यामुळे सेनेचा रुसवा कायम आहे. तर सेनेचे संजय साळवी यांच्या उपनगराध्यक्षपदालाही वर्षाचा काळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे जोर धरला आहे. नगराध्यक्षपद मिळणार नसेल तर उपनगराध्यक्षपदावर सेनेच्याच दुसऱ्या नगरसेवकाला संधी मिळायला हवी, यावरून शिवसेनेतच शीतयुध्द रंगले आहे. त्याबाबत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चार वर्षांपूर्वी रत्नागिरी पालिकेतील राष्ट्रवादी आघाडीची सत्ता उलथवून रत्नागिरीकरांनी मोठ्या अपेक्षा ठेवत सेना-भाजप युतीच्या हाती सत्तेच्या चाव्या सुपूर्द केल्या होत्या. त्यानुसार या दोन्ही पक्षांचा संसार पहिल्या अडीच वर्षासाठी कसाबसा चालला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील युती तुटली अन् त्याचे पडसाद राज्यातील राजकारणातही उमटले. अनेक ठिकाणी सेना-भाजप यांनी फारकत घेतली. रत्नागिरीत पाच वर्षातील सव्वा वर्षांच्या नगराध्यक्षपदाची तिसरी टर्म सेनेची असतानाही विधानसभा निवडणूक असल्याचे निमित्त करून भाजपनेच सेनेकडून सहा महिन्यांसाठी पुन्हा नगराध्यक्षपद मिळवले. मात्र, सहा महिनेच काय दीड वर्षानंतरही भाजपने हे पद सोडलेले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सेनेत प्रचंड अस्वस्थता, संताप आहे. भाजप नगराध्यक्षपद सोडत नसली तरी उपाध्यक्षपद सेनेकडेच आहे. त्या पदावरील सेनेचे संजय साळवी यांचीही सव्वा वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद मिळणार नसेल तर उपनगराध्यक्षपदावर सेनेच्याच दुसऱ्या नगरसेवकाला संधी मिळणे आवश्यक असल्याची मागणी सेनेतूनच होत आहे. या विषयावरून शिवसेनेत अंतर्गत शीतयुध्दही रंगले आहे. याबाबतचा चेंडू सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात असल्याने त्याबाबत निर्णय होणार का? झाला तर उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (प्रतिनिधी) अनेकजण इच्छुक : निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या हाती... रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेचे २७ पैकी १४ नगरसेवक आहेत. संजय साळवी यांनी राजिनामा दिला तरी सेनेचा नवीन उपनगराध्यक्ष निवडून आणण्यात कोणतीही अडचण नाही. हे पद रिक्त होणार असेल तर ती संधी आपल्याला मिळावी, असे पत्र सेनेचे नगरसेवक विनय तथा भैय्या मलुष्टे यांनी सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पक्ष संघटनेला दिले आहे. या पदासाठी सेनेतीलच रशिदा गोदड तसेच अन्य काही नगरसेवकही इच्छूक आहेत. या स्थितीत संजय साळवी यांना त्यांची सव्वा वर्षाची मुदत पूर्ण झाल्याने पक्षनेते राजिनामा देण्यास सांगणार काय? २०१६मध्येसेना स्वबळावर भाजपने ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षपद न सोडल्याने सेना नेते संतप्त आहेत. त्यामुळे खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांनीही २०१६ मध्ये होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘एकला चलोर’े ची तयारी करण्याचे निर्देश सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून २०१६ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सात प्रभागांऐवजी नव्या रचनेनुसार २८ वॉर्डचे ३० वॉर्डमध्ये रुपांतर होणार आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी सेनेत शीतयुद्ध
By admin | Updated: November 21, 2015 23:58 IST