लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : स्थानिक शेतकऱ्यांच्या कलिंगडाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे केकला महागडा खर्च न करता अशी फळे विकत घेऊन ती कापून वाढदिवस साजरा केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास हातभार लागेल, या उद्देशाने सर्वधर्म समभाव या उद्देशाने स्थापन झालेल्या देवरुख येथील हम ग्रुपचे अध्यक्ष सरताज कापडी यांनी वाढदिवस कलिंगड कापून साजरा केला. देवरुखमधील मातृमंदिर या सेवाभावी संस्थेच्या शेतीफार्मवर हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता.
विविध समाजांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने कापडी यांनी हम ग्रुपची निर्मिती केली आहे. या ग्रुपकडून नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबविले जातात. देवरुखमधील मातृमंदिर शेतीफार्मवर कलिंगडांची लागवड करण्यात आली आहे. सध्या वाढदिवसाला केक कापण्याचा ट्रेंड वाढत चाललेला आहे. केक खाण्यापेक्षा तोंडाला लावणे, क्रीम न खाणे असे करून तो केक खाण्यापेक्षा अधिक वाया जातो.
लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारची शेती करण्यास सुरुवात केली. कलिंगडाची लागवड सध्या बऱ्याच लोकांनी केली आहे; पण आता कलिंगडाला दर खूपच कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकाने केकऐवजी कलिंगड किंवा इतर कोणतेही फळ कापून आपला वाढदिवस साजरा केला तर प्रत्येक दिवशी अनेक फळे ही विकली जाऊ शकतात व त्यांच्या विक्रीमध्ये वाढ होऊन त्यांचा फायदा नवीन शेतकऱ्यांना होऊ शकतो, या विचारातून कापडी यांनी कलिंगड कापून नवा पायंडा पाडून दिला आहे.
हम ग्रुप सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कार्यरत आहे. या ग्रुपचे सदस्य यापुढेही फळे कापून व वाटून वाढदिवस साजरा करणार आहेत. यावेळी ॲड. सरताज कापडी, सारा कापडी, विलास कोळपे, संतोष केसरकर, रेवा कदम, प्रमोद हर्डीकर, पंकज संसारे, नीलेश वाडकर, पायल घोसाळकर, नासिर फुलारी व ‘गोकुळ’च्या अधीक्षिका, आदी उपस्थित होते. यावेळी बालिकाश्रमातील मुलींना भेटवस्तू देण्यात आल्या.
कोटसाठी
अशा पद्धतीने इतर लोकांनीही वाढदिवस साजरे केले तर नवीन शेतकऱ्यांना उभारी मिळेल आणि समाजात वेगळा संदेश जाईल.
- सरताज कापडी, अध्यक्ष, हम ग्रुप, देवरुख